नदीपात्रातील गणेश मूर्तींचे कुंडात विसर्जन नगरसेवक बनकर यांनी राबविला अनोखा उपक्रम



नदीपात्रातील गणेश मूर्तींचे कुंडात विसर्जन
नगरसेवक बनकर यांनी राबविला अनोखा उपक्रम

 येवला   प्रतिनिधी
देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र गणेशोत्सवा नंतर पाण्यात बुडालेल्या गणेश मुर्त्यांचे पुढे काय हाल होतात, याकडे ढुंकुन बघायलाही कुणाला वेळ मिळत नाही. मात्र येवल्याचे नगरसेवक प्रविण बनकर यांनी अंगणगाव येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर अस्ता व्यस्त असलेल्या गणेश मुर्तींचे अवशेष एकत्र करुन विधीवत पुजाकरुन या मुर्तींचे एका कुंडात विसर्जन केले आहे.
प्रत्येक उत्सवात आपल्या वेगळेपणाने सहभागी होणारे येवलेकर सर्वच उत्सव मोठ्या हिरीरीने साजरे करीत असतात. गणेशोत्सवही वेगळेपणाने साजरा करण्यात येवलेकर आघाडीवर असतात. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मतदार संघाचा विकास करताना ही बाब हेरुन शहरालगत असलेल्या अंगणगाव येथील गाय नदीवर पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने लक्षावधी रुपये खर्च करुन एक घाट बांधला. या घाटावरच गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर गणेश विसर्जन करण्याचे नियोजन केले. गणेश विसर्जन करताना या घाटावर पाणी बर्‍यापैकी असते. पावसाळा संपल्यानंतरही पाणी असायचे. मात्र यंदा पाउस कमी बरसल्याने येवले शहरासह सर्वत्र दुष्काळ सदृष्य परिस्थिती असल्याने गाय नदी आटली. त्यामुळे नदी घाटावरील पाण्यात विसर्जीत करण्यात आलेल्या गणेश मुर्ती उघड्या पडल्या. यामुर्ती उघड्या पडल्याने ते दृष्य फारच विदारक दिसत होते. अनेक गणेश मुर्तींचे रंग उडालेले, काहींचे अवशेष इतस्त: पसरलेले. तर काही विरघळुन गेलेले. हे दृष्य पाहुन कोणत्याही गणेश भक्ताचे मन हेलावल्या वाचून राहणार नाही. हा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी घाट येवला शहरापासून आघ्या दिड किलोमिटर अंतरावर येवला - विंचूर रस्त्यावर आहे. या घाटावर शेकडो गणेश मंडळांच्या व येवल्यासह अंगणगाव परिसरातील हजारो गणेश मुर्तींचे  विसर्जन करण्यात आले होते. या सर्व हजारो गणेश मुर्ती नदीचे पाणी आटल्याने उघड्या पडल्या हे दृष्य येथील नगरसेवक प्रविण बनकर यांच्या नजरेस पडले. काल शुक्रवार दि. ९ रोजी बनकर यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी कोणताही गाजावाजा न करता वाढदिवस सार्थकी लागावा या उद्देशाने आपल्या प्रकाश हिरो शोरुमचे कर्मचारी, योगेश लहरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन बनकर, प्रविण निकम, गौरव कांबळे, अकबर शहा, निसार लिंबुवाले, समिर समदडिया, नितीन जाधव, ज्ञानेश्‍वर वाळुंज, प्रशांत शिंदे, नंदू जाधव, भुषण वाबळे, संतोष जाधव यांचे सह स्वत: पाणी आटलेल्या नदी घाटात उतरुन सर्व गणेशमुर्तींना विधीवत पुजा करुन एका ठिकाणी गोळा केले. नदीतच एका जागेवर मोठा खड्डा खोदुन त्यात पाण्याचे टँकर ओतुन सर्व गणेश मुर्ती, गणेश मुर्तींचे अवशेष विधीवत विसर्जन करण्यात आले. त्यांचे या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

  फोटो ओळी :-    येवले शहरानजीक अंगणगाव येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर विसर्जीत करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचे मन हेलवणारे दृष्य.
तर दुसर्‍या छायाचित्रात प्रकाश हिरो शोरुमच्या कर्मचार्‍यांसह गणेशमूर्ती हलवितांना नगरसेवक प्रविण बनकर व सहकारी.



 

थोडे नवीन जरा जुने