शिवचरित्र अभ्यासल्याने भविष्य उज्वल प्रा. बानगुडे यांचा आडगाव चोथवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार



शिवचरित्र अभ्यासल्याने भविष्य उज्वल
प्रा. बानगुडे यांचा आडगाव चोथवा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
 येवला : प्रतिनिधी
आपला वर्तमान व भविष्यकाळही उज्ज्वल करायचा असेल तर शिवचरित्र प्रत्येकाने अभ्यासलेच पाहिजे. या शिवचरित्रात आपल्याला आजच्या अनेक समस्यांची उत्तरे सापडतात. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कशी करावी हे छत्रपती संभाजी राजांचे चरित्र अभ्यासले की लक्षात येते. आपला इतिहास उज्ज्वल आहे. हा इतिहास कधीही विसरु नका, असे प्रतिपादन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.
प्रा. बानगुडे पाटील यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळाला. या बद्दल येवला तालुक्यातील आडगाव चोथवा ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या वतीने  त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. बानगुडे-पाटील बोलत होते. अफजल खान बरोबरची प्रताप गडावरील लढाई अवघ्या काही मिनिटात महाराजांनी संपवली. मात्र त्या काही यशस्वी मिनिटांसाठी वर्षभर अतिशय बारकाईने नियोजन महाराजांनी केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेकासाठी अमाप खर्च झाला होता. तो खर्च भरून काढायला औरंगजेबाचा दुध भाउ बहादुरखानाने आपण होऊन महाराजांना संधी दिली. त्याने एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरबी घोडे औरंगजेबाकडे पाठविण्याची तयारी करुन तसा खलिता पाठविला होता. हेरांनी सगळा तपशील गोळा करून आणला. महाराजांनी नऊ हजाराचे सैन्य  खजिना आणण्यासाठी पाठवले. या सरदाराने सैन्याचे दोन भाग केले. एक दोन हजाराचा तर दुसरा सात हजाराचा. दोन हजाराच्या तुकडीने गडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता तो सफल झाला. बहादुरखान मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेला. त्यावेळी मराठ्यांच्या तुकडीने माघार घेऊन पळायला सुरुवात केली. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी पाठलाग सुरू केला. मराठ्यांनी बहादुरखानाला हुलकावणी दिली. दरम्यान मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादुरगडावरील खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगडाकडे कूच केले. तेव्हा पासून पेडगावचे शहाणे असे म्हणण्याची प्रथा पडली असल्याचे प्रा बानगुडे पाटील म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे संभाजीराजे पवार, सुमित काल्हे, प्रदिप सरोदे, तालुका प्रमुख रतन बोरणारे, येवला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत, अरुण काळे, सरपंच नवनाथ खोकले, नवनाथ खोडके, अमोल सोनवणे, दामूपाटील खोकले, प्रकाश खोकले, बाबासाहेब खोकले, गोरख खोकले, प्रविण शिंदे, राजे आदमने, मच्छिंद्र आगवन, प्रविण खोकले, संजय खोकले, पंकज खोकले, कलविंदर दडीयाल, विलास खोकले व ग्रामस्थांच्या वतीने प्रा बानगुडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी तर आभार मुकूंद भोर यांनी मानले. 


थोडे नवीन जरा जुने