येवला व निफाड तालुक्यांमध्ये तातडीने दुष्काळ घोषित करण्याची
छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
येवला :- प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाड तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने या तालुक्यांमध्ये तातडीने दुष्काळ घोषित करण्यात यावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव,नांदगाव, सिन्नर या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तर देवळा,इगतपुरी, नाशिक व चांदवड या तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. मात्र येवला व निफाड तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
येवला तालुक्यात प्रचंड दुष्काळ असतांनाही पावसाच्या आकडेवारीसाठी तालुक्याची सरासरी काढल्यामुळे येवला तालुक्याचा दुष्काळसदृश्य तालुक्यांच्या यादीमध्ये समावेश झालेला नाही. येवला तालुक्यातील सहा पैकी पाच मंडळे प्रचंड दुष्काळाच्या छायेत आहेत. तालुक्याची सरासरी न धरता मंडळनिहाय पाऊस व इतर इंडिकेटर्सचा विचार करणे आवश्यक होते. मात्र 'नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग' या संस्थेकडून मिळालेल्या पीक पाण्याच्या स्थितीनुसार दुष्काळसदृश्य तालुके जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या महसूल यंत्रणेने पाठवलेल्या अहवालांचासुद्धा पीक कापणी प्रयोगासाठी विचार झाला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
येवला तालुक्यातील स्थिर भूजल पातळीमध्ये १ ते २ मीटर घट झाल्याच्या अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नाशिक यांनी पाठवलेला आहे. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त नाशिक व जिल्हाधिकारी नाशिक यांनी दि २५ ऑक्टोबर २०१८ रोजी पाठवलेल्या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, "येवला तालुक्यातील सहा मंडळापैकी एकंदरीत एक मंडळ वगळता उर्वरित मंडळामध्ये झालेले पर्जन्यमान सरासरी पर्जन्यमानापेक्षा अतिशय कमी आहे. तसेच जागेवरील परिस्थिती भीषण दुष्काळाची आहे. तालुक्यातील २३ गांवे १९ वाड्यांना पिण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येवला तालुक्यात टँकर व विहीर अधिग्रहणाची ही ऑक्टोबर २०१८ मधील आकडेवारी पाहता दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे." या भागातील दुष्काळाची फेरपाहणी करण्याचे आपण आश्वासन दिलेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात इतर ठिकाणी दुष्काळ जाहीर होवूनही या भागाचा दुष्काळाच्या यादीमध्ये सहभाग नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. या भागात दुष्काळ जाहीर करण्यासाठी विविध संघटना तसेच राजकीय पक्षांकडून आंदोलने सुरु आहेत. तरी,येथील दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याबाबत महसूल यंत्रणेने पाठवलेल्या अहवालांचा विचार करून येवला व निफाड तालुक्यात तातडीने दुष्काळ घोषित करण्यात यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.