अंदरसुल येथे देशी बनावटीच्या पिस्तोलसह पाच काडतूसे हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
येवला – प्रतिनिधी
तालुक्यातील अंदरसुल शिवारामध्ये मंगळवारी दि.२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन एका इसमाकडून एक देशी बनावटीचे पिस्तोल व पाच काडतुसे हस्तगत केली आहे.
येवला तालुक्यातील विविध गुन्हेगारासंदर्भात शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यामार्फत गुप्त बातमी समजली कि येवला परिसरात बाहेरील जिल्ह्यातील काही गुन्हेगार अवैध अग्निशस्र विक्री करण्यासाठी येणार आहे.. त्यानुसार त्यांनी येवला तालुक्यातील अंदरसुल येथे सापळा रचुन पाठलाग करीत भाऊसाहेब छबु मोरे वय- २५ रा. करंजी ता.कोपरगाव जि. अहमदनगर यास पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याचेकडे एक देशी बनावडीचे पिस्तोल व ९ एम.एमचे ५ जिवंत काडतुसे मिळुन आली. भाऊसाहेब मोरे याचेकडे कुठलाही शस्र परवाना नसल्याने त्याचेविरुध्द येवला तालुका पोलिस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायदा कलम ३-२५ सह मुंबई पोलिस कायदा कलम ३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक संजय दराडे व अप्पर पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अशोक करपे, पोलिस उपनिरिक्षक स्वप्निल नाईक ,सपोउनि रविंद्र शिलावट , पो.हवा.दिपक अहिरे,पो.ना.रावसाहेब कांबळे,भरत कांदळकर,अमोकल घुगे,पो.कॉ.प्रविण काकड,भाऊसाहेब टिळे,इम्रान पटेल,लहु भावनाथ यांचे पथकाने ही कारवाई केली असून अंदरसुल परिसरात यापुर्वीही असाच अवैध शत्र साठा सापडल्याची घटना घडली होती.