हमीभावाने खरेदीच्या नावनोंदणीला १५ पर्यंत मुदतवाढ मूग,उडीद,सोयाबीनची नोंदणी सुरु तर मकासाठी प्रतीक्षा




हमीभावाने खरेदीच्या नावनोंदणीला १५ पर्यंत मुदतवाढ

मूग,उडीद,सोयाबीनची नोंदणी सुरु तर मकासाठी प्रतीक्षा

 


येवला : प्रतिनिधी

जिल्ह्यातील मूग,उडीद,सोयाबीन उत्पादक शेतकऱयांकडून शासकीय हमीभावाने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. या नोंदणीला पंधरा नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली.

येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ व लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघात मूग,उडीद,सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात आली आहे. यासाठी शेतकर्यांना ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असून शेतकऱ्यांनी पीकपेरा असलेला सातबारा उतारा आधार कार्ड व बँकेचे पासबुक नाव नोंदणीसाठी सोबत आणणे आवश्यक आहे तसेच केंद्रावरील नोंदणी फॉर्म देखील भरणे आवश्यक आहे. ही ऑनलाइन नोंदणीची मुदत २४ तारखेपर्यंत होती तर सोयाबीनसाठी ३१ तारखेपर्यंत अखेरची मुदत आहे.

शेतकऱ्यांकडून सातत्याने नावनोंदणीची मुदत वाढविण्याची मागणी होत होती. त्याला अनुसरून नाव नोंदणीची मुदत पंधरा नोव्हेंबर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या वाढलेल्या मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन येथील खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड यांनी केले आहे.

प्रतीक्षा मकाच्या खरेदीची

दरम्यान मका हमिभावाने खरेदीची प्रतीक्षा शेतकरी करत असून यासाठी एक नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत खरेदी करण्याचे नियोजन मार्केटिंग फेडरेशनने केलेले आहे. तशा सूचनाही संघांना देण्यात आल्या आहेत मात्र याबाबत ऑनलाइन नावनोंदणी करण्याच्या सूचना अद्याप मिळाल्या नसल्याचे येथील संघाचे व्यवस्थापक बाबा जाधव यांनी सांगितले.

 

"अल्प पाऊस व दुष्काळी स्थितीने यंदा मूग,उडीद,सोयाबीन आदि पिकांची शेतातच माती झाल्याने विक्रीचे प्रमाण कमी आहे.मात्र थोडाफार पिकलेला मका शासकीय हमीभावानेच विक्रीचे शेतकऱ्यांचे नियोजन आहे.यामुळे मका खरेदीला प्रतिसाद मिळू शकणार आहे.खरेदीसाठी अजून ऑनलाईन नोंदणी सुरु नाही."

-दिनेश आव्हाड,अध्यक्ष,खरेदी विक्री संघ,येवला

थोडे नवीन जरा जुने