रब्बी हंगामाचा विचार करून पालखेड डावा कालव्याला पूर्ण क्षमतेने दोन आवर्तने देण्यात यावी-छगन भुजबळ



रब्बी हंगामाचा विचार करून पालखेड डावा कालव्याला

पूर्ण क्षमतेने दोन आवर्तने देण्यात यावी-छगन भुजबळ

 

  येवला :- प्रतिनिधी

 रब्बी हंगामाचा विचार करून पालखेड डावा कालव्याचे पहिले आवर्तन १५ नोव्हेंबर पासून पूर्ण क्षमतेने देण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांचे कडे पत्राद्वारे केली आहे.

          भुजबळ यांनी म्हटले आहे की,पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम केलेला आहे. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्षे,डाळींब यासह इतर रब्बीची पिके घेतलेली आहे. येवला व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. कांदा हे नगदी पीक असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची अपरिमित हानी होणार आहे. त्यामुळे उभ्या पिकांसाठी सिंचनाचे नियोजन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे. रब्बी हंगामाच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून पालखेड डावा कालव्याला पहिले आवर्तन दि १५ नोव्हेंबर पासून ३० दिवस तर दुसरे तीस दिवसांचे आवर्तन फेब्रुवारीमध्ये देण्यात यावे अशी भुजबळांची मागणी आहे.

          कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करून सिंचनासाठी आवर्तनाचे नियोजन करण्यात यावे.शेतातील उभ्या पिकांचा विचार करून पालखेड डावा कालव्याला पूर्ण क्षमतेने दोन आवर्तने देण्यात यावे  अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

         


थोडे नवीन जरा जुने