वाचनाने व्यक्तीमत्व संपन्न होते प्रा. शिवाजी भालेराव


वाचनाने व्यक्तीमत्व संपन्न होते प्रा. शिवाजी भालेराव

येवला : प्रतिनिधी

 येथील महत्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात अजब प्रकाशनच्या सहकार्याने पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच 'वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व' या विषयावर कवी प्रा.शिवाजी भालेराव यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते.
 वाचन ही जीवनातील महत्त्वपूर्ण प्रेरणा आहे. वाचनाने व्यक्तिमत्व समृद्ध होते, सृजनशीलता निर्माण होते. स्वानुभव घेण्यासाठीची क्षमता विकसित होते. अक्षर वाड्मयाच्या वाचनाने दुसऱ्याच्या अंतरंगात डोकावण्याची क्षमता निर्माण होते. वाचन आणि चिंतनातूनच सामाजिक प्रश्नांचे भान येऊ शकते आणि सामाजिक समस्यांची उकलही शक्य होऊ शकते. वाचनाशिवाय कोणीही विचारवंत निर्माण होऊ शकत नाही. वाचन आणि चिंतन-मनन केल्यानेच विवेक प्राप्त होतो.  लेखनाची प्रेरणादेखील वाचनानेच मिळते. वाचनाने मनुष्यत्व प्राप्त होते, पशुत्व नाहीसे होते. दुर्दैवाने वाचनाचा संबंध हा शिक्षणाशी आणि शिक्षणापुरताच जोडल्याने शिक्षण संपले की वाचनही संपते, परंतु वाचन हे तुम्हाला काळाबरोबर राहण्यासाठी सदैव आवश्यक आहे. असे प्रतिपादन कवी शिवाजी भालेराव यांनी केले.
 त्यानी -
 बळी पेरतो सपान
 काळ्या आईच्या उदरी
 नियतीचा सटवीचा
 शाप त्याच्या भाळावारी....

ही कविताही त्यांनी सादर केली.  
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी वाचन, लेखन, श्रवण आणि भाषण ही परस्परावलंबी भाषिक कौशल्ये असल्याचे म्हटले. वाचनाने लेखन, श्रवण आणि भाषण ही कौशल्ये विकसित होतात. गाणी गाताना गायकाला शब्दांचे अर्थ कळले तर तो अधिक चांगले गातो त्यामुळे सर्व कलांच्या विकासासाठी वाचन महत्त्वाचे ठरते. पुस्तकांसोबतच माणसे,  निसर्ग, भोवताल, समाज वाचता आला पाहिजे पण हे वाचता येण्याची जाणीव अक्षर वाड्मयाच्या वाचनानेच निर्माण होते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. टी. एस. सांगळे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. धनराज धनगर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रोहिणी कवात हिने केले तर आभार प्रा. पंढरीनाथ दिसागज यांनी मानले. कार्यक्रमासाठी हिंदी विभागप्रमुख प्रा.आर.एन.वाकळे, डॉ. जी.डी.खरात, प्रा.डी.व्ही.सोनवणे, प्रा. शरद चव्हाण हे उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रल्हाद जाधव, श्री सोमनाथ कुवर यांनी परिश्रम घेतले


थोडे नवीन जरा जुने