शहीद जवान दिंगबर शेळके यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी



शहीद जवान दिंगबर शेळके यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.

छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

येवला  :- प्रतिनिधी

येवला (जिल्हा नाशिक) तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचे शहीद जवान दिंगबर शेळके यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  लेखी पत्राद्वारे केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, येवला (जि.नाशिक) तालुक्यातील मानोरी येथील  दिंगबर शेळके या सीआरपीएफ जवानाचा आसाममधील तेजपूर येथे मृत्यू झाल्याचे रविवार दि.२४ सप्टेंबर २०१८ रोजी पहाटेच्या सुमारास निदर्शनास आले.सदर मृत्यू आत्महत्या असल्याचे प्रशासनाने शेळके कुटुंबियांना  कळवले आहे.  मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप दिगंबर शेळके यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.  दरम्यान आज येथील ग्रामस्थांनी एकत्र येत मुखेड फाट्यावर रस्ता रोको करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर कुटुंबीयाकडून या घटनेसंदर्भात केंद्रीय गृहखात्याकडून सखोल चौकशी करून न्याय मिळत नाही, तोपर्यंत कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पार्थिव न स्वीकारण्याचे पवित्रा घेतला आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहविभागाकडे पत्रव्यवहार देखील केलेला आहे. 


आसाम राज्यातील तेजपूर येथे सीआरपीएफ कॅम्प येथील तुकडी नंबर ओसीई -३० बटालियन मध्ये स्टोअर विभागात ड्युटीवर असतांना येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील दिगंबर शेळके या जवानाने रविवारी पहाटे स्वत:ला गोळी मारून घेत आत्महत्या केल्याचे सीआपीएफकडून कुटुंबियांना कळविण्यात आले. श्री. दिंगबर शेळके यांना आसाममधील तेजपूर येथे सीआरपीएफ कॅम्प मध्ये स्टोअर विभागाचा चार्ज एक महिन्यापूर्वीच देण्यात आला होता. याबाबत सन २०१४ पासून या स्टोअर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला असल्याचे कुटुंबियांना त्यांनी दि.१४ सप्टेंबर २०१८ रोजी फोनद्वारे कळविले होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्टोअरमध्ये मोठा घोटाळा असल्याची माहिती शेळके यांनी दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दिगंबर शेळके यांनी देशाची एकवीस वर्ष सेवा केली असून त्यांना त्यांच्या चांगल्या सेवेचे प्रमाणपत्र म्हणून सीआरपीएफ विभागाने तीन वर्षे मुदतवाढ दिली होती. स्टोअर विभागामध्ये मोठा घोटाळा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबत वरिष्ठांना या घोटाळ्याची माहिती पण दिली होती. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घोटाळ्यातून आपला बचाव करण्यासाठी ही हत्या केल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. त्यामुळे या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच स्व.शेळके यांना शहीद दर्जा देण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.


थोडे नवीन जरा जुने