येवला मर्चन्टस् को-ऑ.बँकेची सांपत्तिक स्थिती अत्यंत चांगली ! ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये संचालकांचा निर्वाळा !


दि येवला मर्चन्टस् को-ऑ.बँकेची सांपत्तिक स्थिती अत्यंत चांगली ! ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये संचालकांचा निर्वाळा !

येवला – प्रतिनिधी

नाशिक जिल्हयातील सर्वप्रथम स्थापन झालेली , हिरकमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेली नागरी सहकारी बँक म्हणून दि येवला मर्चन्टस् को-ऑप. बँक प्रसिध्द आहे. आजपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या विश्वासास पात्र असलेली बँक असा लौकिक आहे व तो जपला जात आहे. मात्र अलीकडील काही दिवसांत बँकेच्या विश्वासार्हतेबाबत विघ्नसंतोषी लोक निरनिराळया अफवा पसरवत आहेत त्या निराधार असून वस्तुस्थितीला धरून नाही. त्यामुळे बँकेचे ठेवीदार, ग्राहक व हितचिंतकांनी त्या अफवांवर विश्वास न ठेवता आपआपले व्यवहार बँकेशी सुरळीतपणे करावेत असे सर्व संचालक मंडळाने विनम्र आवाहन केले आहे.

      बँकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती देतांना बँकेने आकडेवारी सादर करून त्याअंतर्गत बँकेच्या ठेवी रू.122 कोटी व कर्जवाटप रू.95 कोटी असल्याचे सांगितले तसेच बँकेची एकुण गुंतवणूक ही रू.47 कोटींची असुन त्यापैकी केंद्र व राज्य सरकारच्या कर्ज रोख्यांमध्ये रू.26 कोटी 32 लाख असुन नाशिक जिल्हा मध्य.सह.बँकेमध्ये रू.20 कोटी 71 लाख रूपयांच्या ठेवींमध्ये गुंतवणूक पुर्वीच केलेली आहे. जिल्हा बँकेचे व्यवहार सुरळीत होताच बँकेची सदर गुंतवणूक ही हाताशी येवुन आपल्या बँकेचा आर्थिक व्यवहार सुरळीत होणार आहे.

      बँकेच्या संपुर्ण कारभारावर रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे नियंत्रण असुन बँकेची आर्थिक परिस्थितीबाबतची पत्रके दरमहा रिझर्व बँकेस पाठविली जातात. बँकेची केंद्र व राज्य सरकारच्या कर्जरोख्यांमध्ये करण्यात आलेली रू.26 कोटी 32 लाखांची गुंतवणूक ही रिझर्व बँकेच्या आदेशाने करण्यात आली असुन ती पुर्णपणे सुरक्षित आहे. बँकेने केलेल्या कर्जवाटपापैकी रू.40 कोटी रूपयाचे कर्ज वाटप हे सोनेतारणावर दिलेले असुन ते देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याचप्रमाणे बँकेने आडत व्यापारी, किराणा व्यापारी, छोटे उद्योजक व व्यापारी तसेच विणकर यांनाही सुमारे रू.33 कोटी कर्जवाटप केले आहे व हे सर्व कर्जवाटप देखील सुरक्षित कर्जे याप्रकारात मोडणारे असून सर्व कर्ज प्रकरणात कर्जदारांच्या स्थावर मिळकतीचे मुल्यांकन करून व रजिस्टर गहाणखत करून मिळकती तारण करून घेतलेल्या आहेत.

      तसेच शहरांमध्ये ज्या कर्ज प्रकरणांची अवास्तव अशी चुकीची व दिशाभुल करणारी चर्चा सध्या सुरू आहे. त्याबाबत संचालक मंडळाने आपली भुमिका विषद करतांना बँकेने सुमारे 22 कोटी रूपयांची कर्जे प्रॉपर्टी लोन या सदरात दिलेली आहेत. सदरची सर्व कर्ज प्रकरणे करीत असतांना योग्य ती काळजी घेण्यात आलेली असून कर्जदारांच्या स्थावर मिळकतींचे मुल्यांकन व रजिस्टर्ड गहाणखत करून पुरेशा तारणांवर कर्जवाटप केलेले आहे. हे कर्ज देखील सुरक्षित कर्जप्रकारात मोडणारे असून बँकेने केलेले कर्ज वाटप हे मुळातच चांगल्या कर्जदारांना दिलेले असल्याने धोका नाही. सबब या प्रकरणांबाबत होणारी चर्चा निरर्थक व तथ्यहीन आहे असा दावा संचालकांनी केला आहे.

      बँकेच्या ठेवीदारांच्या रू.1 लाख पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असून त्या प्रिमीयमचा हप्ता दरवर्षीप्रमाणे नियमित भरलेला आहे. सदरचा विमा हा रिझव्र्ह बँकेशी संलग्न असलेल्या ''डिपाॅझिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी स्कीम'' यांचेकडे उतरविला आहे. बँकेचा भाग भांडवल व स्वनिधी हा रू.20 कोटी 69 लाख असून त्यावरून बँकेच्या आर्थिक स्थैर्याची कल्पना केली जाऊ शकते असे मत बँकेच्या संचालकांनी व्यक्त केले.

      वरील सर्व बाबींचा विचार करता या बँकेतील सर्व ठेवीदारांच्या ठेवी या पूर्णपणे सुरक्षित असून ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवुन घाबरून जाण्याचे कारण नाही तसेच ठेवी मुदतपूर्व तोडून व्याजाचे नुकसान करून घेवू नये व बँकेशी आपले व्यवहार नियमित व सुरळीत ठेवावित असेही आवाहन संचालक मंडळाने केले आहे.  नोटबंदीच्या काळात बँकेने अत्यंत चांगल्याप्रकारे सर्व व्यवस्था सांभाळून ठेवीदार, ग्राहक व सभासदांना जी सेवा पुरवली व बँकेप्रती असलेला विश्वास सार्थ केला या विश्वासास भविष्यांतही कोणत्याही प्रकारे तडा जाऊ दिला जाणार नाही. अशी ग्वाही संचालक मंडळाने दिली.


थोडे नवीन जरा जुने