जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज वसुली त्वरित थांबवावी सहाययक निबंधकांकडे शेतकरी संघटनेची मागणी




जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज वसुली त्वरित थांबवावी
सहाययक निबंधकांकडे शेतकरी संघटनेची मागणी
येवला : प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांपासून  पडलेला सलग दुष्काळ   तसेच शेती मालाचे  पडलेले भाव असे असताना ऐन हंगामात नासिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटीसा पाठविल्याने शेतकरी संघटनेने ही कर्ज वसुलीची प्रक्रिया त्वरित थांबवावी अशी मागणी सहाययक निबंधकांकडे केली आहे.
सध्या खरीप हंगामावर पावसाच्या अवकृपेमुळे संकटाचे सावट असतांना जिल्हा बँकेने तालुक्यातील शेतकऱ्यांना थकीत पीक कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.सहाययक निबंधकांमार्फत ह्या नोटिस शेतकऱ्यांना चालू महिन्यात प्राप्त झालेल्या आहेत.एकीकडे जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना नोटा बंदीनंतर पीक कर्जाचे वाटप केले नाही.तर दुसरीकडे शेतकरी कौटुंबिक समस्यांना तोंड देत दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीनाही सामोरे जात आहे.शेतकरी अडचणीत असतांना बँकांनी वसुलीचा बडगा उगारून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.जिल्हा बँकेने सहकारी साखर कारखाना ,संचालकांच्या विविध सहकारी संस्थांना मनमानी कर्जाचे वाटप करून आज ही कर्जे थकीत असतांना त्या कर्जाचे वसुली सोडून शेतकऱ्यांच्या मागे बँक हात धुवून थकीत कर्ज वसुलीसाठी लागली आहे. सदरच्या वाटलेल्या कर्जनमुळेच जिल्हा बँक आज डबघाईस आलेली आहे हे सत्य नाकारून चालणार नाही.महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी थकीत कर्जपोटी आत्महत्या केलेल्या असतांना जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना नोटीसा पाठविण्यापूर्वी विचार करावयास हवा होता असेही शेतकरी संघटनेने सहाययक निबंधकाना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्या खरीप हंगामात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाअभावी दुबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत , शेतकरी मानसिक संकटात असतांना त्यास जप्तीची ,लिलावाची भीती दाखवून त्रास दिला जात आहे.शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची यापूर्वीही वेळेवर भरणा केलेला आहे. मात्र सलगच्या दुष्काळामुळे तसेच शेतीमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी पीक कर्ज भरू शकलेला नाही हे बँकेने लक्षात घेऊन सक्तीची कर्ज वसुली थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सन्तु पाटील झांबरे ,महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख संध्या पगारे ,सुभाष सोनवणे ,जाफरभाई पठाण , अनिस पटेल ,अरुण जाधव ,शिवाजी वाघ ,सुरेश जेजुरकर , सुरेश कदम ,वापुसाहेब पगारे आदींनी दिला आहे.

थोडे नवीन जरा जुने