पालखेडच्या आवर्तनासाठी धुळगावला रस्ता रोको २ फेब्रुवारीला आवर्तन सुरु करण्याचे आश्‍वासन देऊनही अद्याप पाणी नाही

 


 
पालखेडच्या आवर्तनासाठी धुळगावला रस्ता रोको
२ फेब्रुवारीला आवर्तन सुरु करण्याचे आश्‍वासन देऊनही अद्याप पाणी नाही
 येवला -  प्रतिनिधी
तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवत असून पिकांना सद्यास्थितीत पाण्याची आवश्यकता आहे. पालखेड कालव्याचे दुसरे आवर्तन २ फेब्रुवारी रोजी सोडण्यात येणार होते. परंतु अद्यापही आवर्तनाचा थांगपत्ता नाही.  पालखडे कालव्याला तातडीने आवर्तन सोडण्यात यावे, यासाठी मंगळवारी सकाळी धुळगाव येथे येवला - लासगाव रस्त्यावर शेतकरी संघटनेसह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पालकमंत्री व सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
येवले तालुक्यात यावर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे विहीरींना पाणी उतरले नाही. उत्तरपुर्व भागात तर डिसेंबर पासुनच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांनी पाट पाण्याच्या भरवशावर लाखो रुपये भांडवल लावुन कांदा, गहु, हरभरा सारखी रब्बीची पिके उभी केली. प्रशासनाने दुसर्‍या आवर्तनाचा खेळखंडोबा चालवला असुन याबाबत पालखेड प्रशासनाने दखल घेऊन त्वरीत आवर्तन सुरु करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पालखेड प्रशासनाने धरण क्षेत्रातील पाणी साठा, कालवा सल्लागार बैठकीतील सिंचन आरक्षण प्रत्यक्ष पहिल्या आवर्तनात वितरीत केलेले पाणी, दुसरे आवर्तन किती दिवसाचे, पाणी किती मिळणार याचा हिशोब शेतकर्‍यांना द्यावा नाहीतर शेतकरी आजून तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
आंदोलनात राजेंद्र गायकवाड, कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश सोमवंशी, हरिभाऊ पवार, विठ्ठल वाळके, मचिंद्र गायकवाड, सीताराम गायकवाड, सोपान गायकवाड, सोमनाथ गायकवाड, नाना बाराहते, योगेश गायकवाड, संतोष गायकवाड, प्रविण आहेर, मंगेश आहेर, गणेश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, संभाजी गायकवाड, माणिकराव सुर्यवंशी, सुभाष सोनवणे, बाळासाहेब गायकवाड आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.



थोडे नवीन जरा जुने