ऐतिहासिक शिवजयंतीची येवल्यात जय्यत तयारी सुरु
येवला : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची येवल्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्व काळापासून साजरी होणारी शिवजयंती करण्यासाठी उत्सव समितीने कंबर कसली असून त्याबाबत जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे. मिरवणूक मार्गात व परिसरातील स्वच्छता करण्यात येवून भगवे झेंडे लावण्यात येणार आहे. उत्सव समितीच्या तयारीच्या आढावा बैठकीत प्रमुख संयोजक सुभाष पाटोळे ,युवराज पाटोळे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी संजीवनी रुरल एजुकेशन सोसायटीचे विश्वस्त नितीनदादा कोल्हे पाटील यांचेसह प्रांताधिकारी,तहसीलदार या प्रमुख अतिथीसह शहर व तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
गेली 78 वर्ष तिथीनुसार साजरी केली जाणारी ही येवल्यातील ऐतिहासिक शिवजयंती यंदा मात्र 19 फेब्रुवारीला साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.19 ) सकाळी 9 वाजता संपूर्ण येवला शहर व तालुक्यातील शिवराय प्रेमी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणार आहेत. त्यानंतर भव्य रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. अग्रभागी सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे झांज पथक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा रथ, त्या पाठोपाठ अश्वावर स्वार मावळ्यांसह बाल शिवराया आणि जिजामाता आणि सहभागी शिवप्रेमी नागरिक अशी भव्य मिरवणूक येथील पाटोळे गल्लीतून निघणार आहे. पाटीलवाडा, डीजेरोड, बुरुड गल्ली, जब्रेश्वर खुंट, काळामारुती रोड, देविखुंट, टिळक मैदान, ते पाटोळे गल्ली असा मिरवणुकीचा मार्ग आहे.