शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्यासाठी नाही तर माणूस बनविण्यासाठी आहे : कवी खलील मोमीन




शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्यासाठी नाही तर माणूस बनविण्यासाठी आहे : कवी खलील मोमीन 

येवला : प्रतिनिधी 

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाची सांगता आज वार्षिक पारितोषिक वितरणाने झाली त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी खलील मोमीन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा. अॅड. माणिकराव शिंदे हे होते.  
शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून माणूस घडविणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट्य असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी खलील मोमीन यांनी केले. ब-याचदा शिक्षणात अपयश येते आणि हे शिक्षण अपूर्ण सोडून देण्याची वृत्ती दिसते पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे लक्षात घ्या. अपयश पचविता येणे जीवनात यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वाचे असते. आज आपण सर्व पोटार्थी बनत चाललो आहोत आणि त्यामुळे शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला आहे. पोटार्थी असावे पण माणूस बनण्यासाठी लागणारी मानवी मूल्ये आपण जोपासली तरच मानवी संस्कृती टिकेल. साहित्यातून ही मानवी मूल्ये आपल्या पर्यंत पोहचविण्याचे कार्य कवी, लेखक, साहित्यिक करतात असे ते म्हणाले. त्यांनी अनेक  कविता सादर केल्या. आकाश कंदील, वड आणि परवड या सामाजिक जाणीवेच्या कविता सादर करताना समाजातील विषमतेवर आणि हुंड्यासारख्या कुप्रथांवर त्यानी विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले. 'कवी हा व्यक्त होणारा रसिक असतो तर रसिक हा व्यक्त न होणारा कवी असतो' या दोघांनीही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयात साफ-सफाईचे काम करणाऱ्या मावशींचा सत्कार करण्यात आल्याचा विशेष उल्लेख करताना श्रमप्रतिष्ठा हे मूल्य जोपासणाऱ्या संयोजन समितीचे त्यानी अभिनंदन केले. ज्ञान आणि श्रम या दोन्हींचा संगम माणसाला जीवनात यशस्वी करतो असे ते म्हणाले. स्नेह संमेलनातील शेला–पागोटे ही विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणारी आणि आनंद देणारी स्पर्धा असते असे सांगत महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल त्यानी संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. 
स्नेहसंमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या प्रगतीचा लेखा-जोखा सादर केला. वरिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक अहवालाचे वाचन स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. आर. एन. वाकळे यांनी केले, तर प्रा. अमित सोनवणे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक अहवाल सादर केला. क्रीडा विभागाचा प्रगती अहवाल उपप्राचार्य व क्रीडा संचालक श्री शिरीष नांदुर्डीकर यांनी सादर केला. पारितोषिक वितरणाची घोषणा डॉ. धनराज धनगर, प्रा. डी.के. कन्नोर, प्रा. ए.पी. वनारसे, प्रा. विठ्ठल सातपुते यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. अमित सोनावणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या   यशस्वीतेसाठी प्रा. टी. एस. सांगळे, प्रा. एस. डी. गायकवाड, प्रा. जी.डी.खरात,  प्रा. डी. व्ही. सोनवणे, प्रा. पी. आर. दिसागज, प्रा. ए.पी.बागुल, श्री सोमनाथ कुवर, श्री प्रल्हाद जाधव, श्री अर्जुन बच्छाव,श्री किरण कापडणीस यांनी श्रम घेतले. व्यासपीठावर कार्यालयीन अधीक्षक व स्नेह संमेलन प्रमुख श्री बी. यु. अहिरे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. दादाभाऊ मामुडे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात सुरुवातीला पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल डॉ. धनराज धनगर, डॉ. मनीषा गायकवाड यांचे सत्कार करण्यात आले. विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल कु. सीमा खोकले आणि नॅक समन्वयक म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा. कमलाकर गायकवाड यांचेही सत्कार करण्यात आले. मराठी विषयात प्रथम येणा-या कु. स्वाती शिवाजी गोरे या विद्यार्थीनीस कै. विठ्ठलराव गमे पारितोषिक तर बी.कॉम. परीक्षेत प्रथम येणाऱ्या गवळी प्रेरणा या विद्यार्थिनीस रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यासोबतच पूजा भागवत (प्रथम, एफ.वाय.बी.कॉम.), सीमा खोकले(प्रथम, एफ.वाय.बी.ए.), राजवाडे रोहिणी (प्रथम, एस.वाय. बी.ए.), निसाळ अतुल पोपट (प्रथम, एस.वाय. बी.कॉम.), शेळके ललिता (प्रथम, टी.वाय. बी.ए.), थोरात सुचेता संजय (प्रथम. एम.ए. अर्थशास्त्र ), पटेल समीक्षा सुबोध (प्रथम, एम. कॉम.) यांनाही गौरविण्यात आले. 
स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये साडी डे स्पर्धा – प्रथम –सविता धनगर, द्वितीय माधुरी भावसार, धोती डे स्पर्धा –प्रथम – पटेल सैफ अली, द्वितीय –सतीश चव्हाणके, मेहंदी स्पर्धा –प्रथम आरखडे मोनाली, द्वितीय –भाग्यश्री वाघ, पुष्प रचना स्पर्धा –प्रथम –शिंदे सुनीता, द्वितीय –सातपुते रेशमिका, पाककला स्पर्धा - प्रथम – पल्लवी खैरनार, द्वितीय –शशिकला गांगुर्डे, पारंपरिक डे स्पर्धा प्रथम –चव्हाण स्वाती आणि सागर बनकर तर द्वितीय दीप भुसारी, बांगड्या स्पर्धा - प्रथम –प्रिया कराड , द्वितीय पल्लवी खैरनार , आनंद मेला स्पर्धा –प्रथम –अश्विनी भांडगे व चव्हाण बापू, द्वितीय-सौंदाणे अजय व ठोंबरे रुषीका, वक्तृत्त्व स्पर्धा –प्रथम – खोकले सीमा, द्वितीय –शशिकला गांगुर्डे, रांगोळी स्पर्धा –प्रथम-आरखेडे मोनाली, द्वितीय –आव्हाड पूजा, निबंध स्पर्धा –प्रथम- रोहिणी डुंबरे, द्वितीय -सातपुते रश्मिका या विद्यार्थ्याना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र, पदके व स्मृतीचिन्हे देऊन गौरविण्यात आले. याशिवाय क्रीडा विभागामार्फत कबड्डी, कुस्ती, नेटबॉल, बेसबॉल, लॉन टेनिस या स्पर्धांमध्ये विद्यापीठस्तरीय, राज्य स्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील निवड झालेल्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या रोहन लोणारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 



थोडे नवीन जरा जुने