बिनशेती महसूलासाठी महसुल अधिकारी घरोघर……………
येवला – वार्ताहर
शहरातील बिनशेती शेतसारा वसुलीसाठी महसुल विभागाचे २४ तलाठी व ५ मंडलाधिकारी असलेले पथक घरोघर जाऊन शासनाचा महसूल गोळा करीत आहे. शहरामध्ये प्रचंड प्रमाणात असलेले बिनशेती प्लॉटधारकांकडे लाखो रुपयांची थकबाकी असल्याने तहसिलदारांनी या थकलेल्या महसूलासाठी तालुक्यातील सर्वच तलाठी व मंडलाधिकारी यांचा फौजफाटा दि. १ मार्च ते ६ मार्च या कालावधीकरिता शहरात वसूलीसाठी नेमलेला आहे. बिनशेती प्लॉटधारकांनी तात्काळ आपल्याकडे थकबाकी असलेला व चालू बिनशेती शेतसारा भरण्याचे आवाहन तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांनी केले आहे.
शहराच्या आसपास गेल्या ३० ते ४० वर्षांपासून कित्येक जमिनी बिनशेती झालेल्या आहेत. महसूल विभागाच्या नियमाप्रमाणे या प्लॉटधारकांना दरवर्षी बिनशेती शेतसारा भरावा लागतो. प्रत्येक बिनशेती प्लॉटचे आकारमान पाऊन गुंठा ते ४ गुंठ्याइतके असल्याने शहरामध्ये असे हजारो खातेदार आहेत. जेव्हा सातबारा उतारा काढायची वेळ येते तेव्हाच बिनशेती पावतीचा विषय येत असल्याने अनेकांचे या बिनशेती शेतसाऱ्याकडे दुर्लक्ष झाल्याने थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. त्यात येवला व अंगणगाव या दोन गावांमध्ये बिनशेती प्लॉटचे प्रमाण जास्त असल्याने खातेदार जास्त असले तरी दोन्ही गावामिळून एकच सजा आहे व कामकाज बघण्यासाठी एकच तलाठी आहे. कामाच्या बोज्यामुळे सतत वरीष्ठांच्या नजरेत रहावे लागत असल्याने येवला सजेचा कारभार स्विकारण्यासाठी कोणीही तलाठी धजावत नसल्याचे खाजगीत बोलले जाते. त्यामुळे महसुल विभागाने तालुक्यातील प्रत्येक मंडलाधिकाऱ्याच्या हाताखाली ४-५ तलाठी देत एकुण पाच पथके बनवली आहेत. मंडलाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक घरोघर बिनशेती सारा वुल करून जागेवर पावती देत आहे. नागरिकांकडून या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून बहुतांश वसुली होत आहे.
या मोहिमेअंतर्गत अनधिकृत बिनशेती बांधकामाची पाहणीही करण्यात येणार असून नगरपालिका हद्दीबाहेर असलेल्या अंगणगावमधील अनधिकृत बिनशेती बांधकामांचाही पंचनामा करण्यात येणार आहे. या मोहिमेत केलेल्या कामाचा स्वयंस्पष्ट अहवाल दि. ७ मार्च रोजी तहसिलदारांना सादर करण्यात येणार आहे.