कर थकवल्याने येवल्यात पालिकेने केले दोन मोबाईल टॉवर सील

 

कर थकवल्याने येवल्यात पालिकेने केले 
दोन मोबाईल टॉवर सील

येवला  :  वार्ताहर
महाराष्ट्र शासनाने यंदा १०० टक्के करवसुलीचे उद्दीष्ट्य सर्व नगरपालिकांना दिलेले असल्याने येवला नगरपालिकेने सध्या करवसुलीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे.  सक्त करवसुलीचा भाग म्हणुन शहरातील दोन मोबाईल टॉवर नगरपालिकेच्या वसुली पथकाने सील केले आहे.
शहरातील देवीखुंट भागात शैलेष लाड यांच्या इमारतीवर असलेले जी.टी.एल.इन्फ्रा.लि. या कंपनीचे मोबाईल टॉवरचे  ३ लाख ६९ हजार ५३९ इतकी तर शाह कॉलनी भागातील भारतीय एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरचे १ लाख १४ हजार २२० इतकी थकबाकी असल्याने संबंधीत कंपनीस बिल व नोटीसा  देऊनही त्यांनी मालमत्ता कराची रक्कम न भरल्यानेे अखेर दोन्ही टॉवर नगरपालिकेच्या वसुली पथकाने सिल केले असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.  ह्या कारवाईत उपमुख्याधिकारी आर.आय. शेख, सहा. करनिरिक्षक अरुण गरुड, भांडारपाल विजय शिंदे, संगणक अभियंता अभितोष सांगळे, स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड, आर.डी. पाटील, उदय परदेशी, नारायण कोटमे, विरेंद्र परदेशी, रविंद्र नागपुरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
अशा प्रकारची सक्त वसुलीची मोहीम शहरात चालु राहणार असुन थकबाकी असलेल्या नागरीकांचे नळ कनेक्शन तोडणे व मालमत्ता जप्ती सारखे निर्णय घेण्यात येणार असल्याने नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.  असे कटु प्रसंग टाळण्यासाठी व शहराच्या विकासास हात लावणेसाठी नागरीकांनी कर भरुन सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष बंडु क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.
15 मार्च 18 मार्च या कालावधीत नगरपालिकेने जुन्या कार्यालयात विशेष करवसुली शिबीराचे आयोजन केले होते त्यास शहरातील नागरीकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.  वसुलीचे उद्दीष्ट्य पुर्ण करण्यासाठी कालावधी कमी असल्याने सुटीच्या दिवशी देखील करवसुली करण्यात येत आहे.  त्यामुळे नागरीकांनी त्यांचे कडे असलेली कराची रक्कम तात्काळ भरावी असे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.  


थोडे नवीन जरा जुने