अतिरिक्त कर्मचार्यांना सेवेत सामावून घ्या
नपा., मनपा कर्मचारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
येवला - वार्ताहर
शासनाने राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये रुपांतर केले असून या नगरपंचायतींमध्ये अनेक कर्मचारी अतिरिक्त ठरत असून या कर्मचार्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी भारतीय मजदूर संघ प्रेणित नपा मनपा कर्मचारी महासंघाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या तीन वर्षांपूर्वी राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे. शासनाने नगरपरिषद व नगरपंचायतींचा आकृतीबंध मंजूर करतांना लोकसंख्यानुसार पदे निर्माण करणे आवश्यक होते. परंतु शासनाने ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये रुपांतर करतांना लोकसंख्येचा विचार न करता आकृतीबंध मंजूर केला. त्यामुळे आज अनेक नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये कर्मचारी अतिरिक्त ठरत आहे. ग्रामपंचायतीपासून ते नगरपरिषद, नगरपंचायत निर्माण झाल्यानंतर अनेक कर्मचार्यांची सेवा या ठिकाणी १० ते १५ वर्षापावेतो झालेली आहे. न. पा. प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक यांनी विशेष पदे निर्माण करुन अतिरिक्त ठरत असलेल्या कर्मचार्यांना सेवेत सामावून घेणे आवश्यक आहे. शासनाने या कर्मचार्यांच्या वेतनासाठी सहाय्यक अनुदान मंजूर केले आहे. मात्र, राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांकडून वेतन प्रस्तावाची छाननी चालू आहे. यामुळे नगरपरिषद व नगरपंचायतीत सद्या कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना आजपावेतो ग्रामपंचायतीनुसार वेतन मिळत असून किमान वेतन सुद्धा या कर्मचार्यांना मिळत नसल्याचे समोर आले आहे. नियमित वेतन श्रेणी जोपावेतो लागु होत नाही, तो पर्यंत नगरपरिषद व नगरपंचायतीतील कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना शासन नियमानुसार किमान वेतन लागु करावे, अशी मागणीही नपा मनपा कर्मचारी महासंघाने या निवेदनात केली आहे.
नगरपरिषद व नगरपंचायतीतील कर्मचार्यांची सेवा ते ग्रामपंचायतीत जेव्हा पासून सेवेत आहे, तेव्हापासून त्यांची सेवा ग्राह्य धरण्यात यावी. जेणेकरुन या कर्मचार्यांना निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटीचा लाभ मिळेल, अशी मागणीही महासंघाने निवेदनात केली आहे. नपा प्रशासनाच्या संचालकांनी आपल्याला असलेल्या अधिकाराचा उपयोग करुन नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये विशेष पदे निर्माण करुन अतिरिक्त कर्मचार्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे, अशी माहिती नपा मनपा कर्मचारी महासंघाचे प्रदेश संघटकमंत्री शशिकांत मोरे, नाशिक विभागीय सचिव प्रशांत पाटील, महासंघाचे मार्गदर्शक श्रावण जावळे यांनी दिली आहे. महासंघाने निवेदनाच्या प्रती नपा प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनाही दिल्या आहेत.