ग्रामदक्षता समितीच्या बैठक नियमितपणे घ्यावी - दिपक देशमुख

येवला - (अविनाश पाटील)
तालुक्यातील गावांमध्ये ग्रामदक्षता समितीच्या बैठका होत नसल्याने
ग्रामस्तरावर तक्रारींचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आहे. या तक्रारी तालुका
समितीकडे येत आहेत. तालुक्यातील सर्व सरपंच, तलाठी व ग्रामसेवक व स्वस्त
धान्य दुकानदारांची संयुक्त बैठक आयोजित करून ग्रामदक्षता समितीची बैठक
ग्रामस्तरावर घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी दक्षता व
पुरवठा समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली.
दक्षता व पुरवठा समितीची बैठक तहसील कार्यालयात समिती अध्यक्ष दीपक
देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. शासनाने
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत ठरवून दिल्याप्रमाणे पात्र कार्डधारकांसाठी
फेब्रुवारी महिन्यात मंजूर करण्यात आलेल्या धान्याच्या नियतनाबाबत माहिती
देण्यात आली. तालुक्यात प्राप्त झालेली 550 क्विंटल साखर अंत्योदय व
बीपीएल कार्डधारकांना प्रतिमाणसी 550 ग्रॅम याप्रमाणे वाढ करण्यात येईल,
असे तहसीलदार शरद मंडलिक यांनी सांगितले. केरोसिनचा 20 टक्के कोटा मंजूर
झालेला असल्याने पात्र कार्डधारकांना त्याच प्रमाणात केरोसिनचे वाटप
करण्यात येईल, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. अन्नसुरक्षा योजनेत
निवड केलेल्या लाभार्थ्यांची यादी स्वस्त धान्य दुकानांमध्ये प्रसिद्ध
करावी व धान्याचे दर फलकावर लावण्याची मागणी सदस्य बाळासाहेब दौडे यांनी
केली.जीवनदायी आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी रुग्णांना
रेशनकार्डची सक्ती केली जाते. परंतु, बर्‍याच रुग्णांचे रेशनकार्ड जीर्ण
असल्याने ते ग्राह्य धरले जात नसल्याची तक्रार पंचायत समिती सभापती
शिवांगी पवार यांनी केली. यावर ज्यांचे रेशनकार्ड खराब आहे, त्यांना
तहसील कार्यालयामार्फत शासनाचे प्रमाणपत्र तत्काळ देण्यात येत आहे.
रुग्णांना दोन दिवसांत रेशनकार्ड बदलून दिले जाईल, अशी माहिती
तहसीलदारांनी दिली. स्वागत गॅस एजन्सीच्या कामकाजाबाबत ग्राहक परिषद
सदस्य विनोद बनकर यांनी तक्रार केली. या वेळी सदर एजन्सीची तपासणी करून
दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदारांनी सांगितले. या
प्रसंगी नगराध्यक्ष नीलेश पटेल, समिती सदस्य संतू पाटील झांबरे, संजय
पगारे, भीमाजी बागुल, भरत नागरे आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने