राष्ट्रवादीच्या दोन गटांत हाणामारी.....पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिस संबंधितांवर कारवाई करीत नाही - - शिरीन शेख, नगरसेविका

येवला (अविनाश पाटील) शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन गटांमध्ये
मंगळवारी रात्री तुफान हाणामारी झाली. शहर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी व
परस्परविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. यातील संशयित मात्र फरार आहे. दोन वेळा तक्रार करूनही पोलिस
विरोधी गटातील लोकांवर कारवाई करीत नसल्याने नगरसेविका शिरीन शेख यांनी
राजीनामा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठवला आहे. मंगळवारी रात्री 9
वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नगरसेविका शिरीन शेख
यांचे पती युनूस शेख कासम व राष्ट्रवादी अल्पसंख्याक कॉँग्रेस सेलचे
शहराध्यक्ष शेख निसार अहमद अब्दुल रज्जाक यांच्या गटांमध्ये मुलांच्या
झालेल्या हाणामारीवरून दंगल झाली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात शेख युनूस
कासम यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 12 जणांविरोधात दंगलीचा
गुन्हा दाखल केला आहे. यात हमीद ऊर्फ पम्या हाजी निसार अहमद अब्दुल
रज्जाक शेख, तौफीक शेख, मतीन शेख, खलील रज्जाक शेख, अर्शद खलील शेख, राशद
खलील शेख, अरिफ शेख रज्जाक, जावेद शेख, अबीन शेख (सर्व राहणार कमानीपुरा)
यांचा समावेश आहे. आपली मुले शहरातील आइना मशिदीजवळ खेळत असताना अर्शद व
राशद खलील शेख या दोघांनी शिवीगाळ केली. याबाबतत विचारणा करण्यासाठी गेलो
असतो सदर संशयितांनी लोखंडी पाइप, तलवार व लाकडी दांड्याने मारहाण केली.
यात आपणाबरोबर असलेले रेहान रसूल शेख, तबरेज रसूल शेख यांनाही मारहाण
केल्याचे युनूस शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
राष्ट्रवादी अल्पसंख्याक कॉँग्रेस सेलचे शहराध्यक्ष शेख निसार अहमद
अब्दुल रज्जाक यांनीही युनूस कासम शेख यांच्यासह 11 जणांविरोधात फिर्याद
दिली आहे. यात नासीर शेख कासम, अय्युब शेख अक्रम, शेख कासम, हनीफ शेख
कासम, हुसेन शेख हनीफ, पापा रियान रसूल, जाफर शेख गफूर, समीर शेख नासीर,
अय्यार शेख रसूल, इक्बाल शेख गफूर यांचा समावेश आहे.
दरम्यान नगरसेविका शिरीन शेख यांचे पती युनूस शेख कासम हे शहरातील सोनवणे
हॉस्पिटलमध्ये दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दोन्ही गटाकडून
आरोप प्रत्योरोपाच्या फैरी झडत असून नगरसेविकेच्या पतीकडूनच मारहाण
झाल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल चे शहराध्यक्ष शेख निसार अहमद
अब्दुल रज्जाक यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, माझ्या पुतण्यांना युनूस
शेख कासम याने बेदम मारहाण केली. बाजार करून घरी येत असताना त्यांच्यावर
युनूसने हल्ला करीत खिशातील पैसे काढून घेतले.
तर राष्ट्रवादीच्याच नगरसेविका शिरीन शेख या म्हणतात की, यापूर्वीही
विरोधकांनी माझ्या पतीस मारहाण केली होती. दोन वेळेस पोलिसांकडे तक्रार
करूनही पोलिस संबंधितांवर कारवाई करीत नाही. सत्ताधारी पक्षाची नगरसेविका
असूनही कामे होत नसल्याने पदाचा राजीनामा भुजबळ यांच्याकडे पाठविला आहे.
थोडे नवीन जरा जुने