येवला - येवला शहर पोलिसांच्या कारनाम्यांचे वाभाडे निघत असताना येवला तालुका पोलिसांनी आज दिवसभरातच सुतावरु स्वर्ग गाठणे या म्हणीचा प्रत्यय दिला. शर्टांच्या कॉलरवरील टेलरच्या लेबलवरून त्यांनी शनिवारी सकाळी अनकाई किल्याजवळ नगर मनमाड महामार्गालगत सापडलेल्या अनोळखी मृत तरूणाचा तपास केला. या मृतदेहाची ओळख पटली असून सदरचा तरूण विद्यावर्धीनगर साक्री रोड धुळे येथील असून त्याचे नाव प्रशांत निळकंठ मराठे असे असून तो इंडिकाव्हिस्टा गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. सदरची इंडिका व्हिस्टा एम.एच ३९ बी २४८७ ही गाडी मालेगाव कॅम्प परिसरात बेवारस आढलल्याचे समजते. या तरुणाच्या उजव्या कानाखाली गोळी झाडल्याचे स्पष्ट दिसून येत असून याबाबत पोलिस हवालदार बी.एम.मालचे यांनी येवला तालुका पोलिस ठाण्यात भादंवि ३०२ या कलमान्वये फिर्याद दाखल केली आहे. सदरचा तरुण विवाहीत असून त्याला पंधरा दिवसाचा मुलगा आहे.