ना. भुजबळांनी घेतला येवल्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा

येवला  - दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा दौर्‍यावर असलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात शासकीय अधिकारी व पदाधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी पाणीटंचाई, ग्रामीण पाणीपुरवठा, चाराटंचाई, ग्रामीण रोजगार हमी योजना, महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान, वीज वितरण कंपनी, जलसंपदा, मांजरपाडा, पुणेगाव-दरसवाडी, डोंगरगाव, लघु पाटबंधारे प्रकल्प तसेच पालखेड डावा कालवा व वनविभागाच्या विवधि विषयांची माहिती घेऊन संबंधित शासकीय अधिकार्‍यांना सूचना केल्या.

शहरातील पाणीपुरवठा, होर्डींग्ज, हातपंप, सार्वजनिक वाचनालय, भुयारी गटार योजना, स्मशानभूमी यांसह विविध विषयांबाबत संबंधित अधिकार्‍यांकडून माहिती घेतली व त्यांना योग्य त्या सूचना केल्या. ३८ गाव पाणीपुरवठा योजनेबाबत चर्चा करताना अध्यक्ष सचिन कळमकर यांनी सांगितले की, पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात पालखेड कॅनॉलचे पाणी घेण्यासाठी पाईप क्षमता वाढविण्याकामी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडून ४७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच सद्यस्थितीत १६ टॅँकरद्वारे ३३ गावे व १२ वाड्यांना पाणीपुरवठा सुरु आहे. आगामी काळात एकूण ६५ गावे आणि २४ वाड्या अपेक्षित असल्याचे गटविकास अधिकारी जोशी यांनी यावेळी सांगितले. ना. भुजबळ यांनी नगरपालिका व ३८ गाव पाणीपरवठा योजनांच्या शिल्लक पाणी साठय़ाबाबत चौकशी करून नगरपालिकेने याकामी योग्य नियोजन करण्याच्या सूचना केल्या.बैठकीप्रसंगी ना. भुजबळांसमवेत सरिता नरके, नीलेश पटेल, गणेश रिचवाल, खांडेकर, वाघ, उशीर, गवारे, बाळासाहेब गुंड, भारती जगताप, राजश्री पहिलवान, मुश्ताक शेख, शफिक शेख, प्रदीप सोनवणे, प्रवीण गायकवाड, साईनाथ मोरे, पं.स. सभापती राधिका कळमकर, भारती येवले, हरिभाऊ जगताप, प्रकाश वाघ, पोपट आव्हाड, शुभांगी पवार, मीना ताडवी, बाळासाहेब लोखंडे, बी.आर. लोंढे आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने