येवला - राजापूर- हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या येवला तालुक्यातील
राजापूर येथील राजू-मन्नाशा यात्रा सोमवारपासून सुरू झाली आहे. कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन देवाज ग्रपुचे संस्थापक अध्यक्ष सुहास कांदे यांच्या हस्ते होणार असून, उपस्थिती कुणाल दराडे, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, र्मचन्ट बँकेचे माजी अध्यक्ष दिनेश आव्हाड, शिवसेना नेते राजेश लोणारी, पं.स. सदस्य पोपट आव्हाड, शिवसेना शाखाप्रमुख अशोक आव्हाड, सरपंच दत्तू दराडे राहणार आहेत. सुमारे सोळाव्या शतकात येवला तालुक्यातील राजापूर हे गाव अरबी सामंत काळातील नगर जिल्ह्यातील भाग होता. त्यावेळी राजा मन्नाशा स्थानिक प्रशासक होता. राजाने त्या काळातत बांधलेली मशीद आजही उभी आहे. राजाच्या निधनानंतर राणीने अनेक वर्ष येथील कारभार पाहिला व राजाची आठवण म्हणून मन्नाशाची यात्रा भरवण्यास सुरुवात केली. राजाने बांधलेल्या मशिदीच्या बाजूस एक सुंदर बाग होती. सध्या ती अस्तित्वहीन झाली आहे. या बागेत राणीने राजाची कबर तयार केली आहे. तेथे आज हिंदू-मुस्लिम हा भेदभाव विसरून ग्रामस्थ यात्रा भरवतात. या यात्रेला येथील गावकरी राजूमन बाबांची यात्रा असे म्हणतात. सुमारे चारशे वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेला ग्रामस्थांसह परिसरातून हजारो भाविक येतात. ग्रामस्थांनी जमा केलेल्या वर्गणीतून या कबरीस पाच-सहा दिवस आधीच रंगकाम केले जाते. यात्रेच्या अगोदरच्या दिवशी मुस्लिम बांधव सनई वाद्याच्या गजरात संदल चढवतात. नारळ, मलिदा (पोळया व गूळ यांचे मिश्रण) व अगरबत्ती धूप देऊन नवस फेडतात. |