येवला-पुरणगाव (ता. येवला) येथे पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत
चालली आहे. आरक्षित जे बंधारे असतील ते पालखेडच्या पाण्याने पूर्ण भरुन
द्यावी, यासाठी या रास्ता रोको आंदोलन आज सकाळी १0 वाजता बाबा थेटे, संतु
झांबरे व ग्रामस्थ यांचे उपस्थितीत करण्यात आले. यावेळी झांबरे म्हणाले, जर पिण्याचे पाणी आरक्षित असेल तर आरक्षित बंधारे शासनाने तात्काळ भरुन द्यावीत, पालखेड धरणातून सोडलेले पाणी येवला, मनमाड, पाटोदा येथे येण्यासाठी बराच कालावधी का लागतो? तर जागोजागी ४ इंची विद्युत मोटारी अनेक शेतकर्यांनी पाटामध्ये राजरोजपणे अधिकार्यांच्या कृपाशिवार्दाने टाकलेले आहे. त्यामुळे निम्मे पाणी कमी होते. याकडे अधिकार्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बाबा थेटे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सुरेंद्र शिरसाठ, निकम यांचे मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचीही तारांबळ उडाली. निवेदन स्वीकारण्यासाठी तहसिलदार हरिष सोनार, मंडल अधिकारी एन. एम. कांबळे उपस्थित होते. त्यांनी लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. रास्ता रोकोसाठी ग्रामस्थांनी स्वत:हून हजेरी लावली. त्यात महिला वर्ग देखील मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता. महिलांनी रिकामे हंडे हातात घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या. तहसिलदार हरिष सोनार यांनी निवेदन स्विकारले व जिल्हाधिकार्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. थेटे यांनी उद्या दुपारपर्यंत निर्णय न झाल्यास कुठल्याही क्षणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. आंदोलनात सरपंच रेश्मा ठोंबरे, उपसरपंच नाना ठोंबरे, प्रकाश शिंदे, ग्रा.पं. सदस्य तुकाराम शिंदे, ग्रामीण पा.पु. अध्यक्षा शांता थेटे, उपाध्यक्षा कल्पना ठोंबरे, अर्चना गाढे, सिंधूताई ठोंबरे, शिला ठोंबरे, भाऊसाहेब ठोंबरे, चिंधू वरे, मच्छिंद्र वरे, विकास ठोंबरे, विलास वरे, बाळू ठोंबरे, रावसाहेब ठोंबरे आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सदर बंधारा पालखेडच्या पाण्याने भरुन दिल्यास जळगांव पुरणगांव, पिंपळगाव, शेवगे आदी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. |