येवला - येवला तालुक्यातील पाणीटंचाई, रोजगार आदी संबंधीची माहिती
घेण्यासाठी ना. छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात तालुक्यातील सर्व
अधिकार्यांची आढावा बैठक ना. भुजबळांचे विशेष कार्य अधिकारी अनिल सोनवणे
यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीत तालुक्यातील, ग्रामीण भागातील, तसेच शहरातील पिण्याच्या पाण्यासंबंधी आढावा घेण्यात आला, तसेच तालुक्यात सध्या 2 टँकरद्वारे मौजे कुसमाडी, चांदगाव, बाळापूर, सावरगाव, भाटगाव, पुरणगाव, चिचोंडी बु. व खुर्द या 8 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मौजे सोमठाण जोश, तांदुळवाडी, तळवाडे, डोंगरगाव व बदापूर या 5 गावांनी टॅकची मागणी केली असून, त्यांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पालखेड कॅनॉलचे पुढील आवर्तनाबाबत चर्चा करण्यात आली. मार्च महिन्याचे पहिले आवर्तन सोडण्याबाबत विचाराधिन असल्याचे संबंधित अभियंता यांनी सभेत सांगितले. मुख्याधिकरी मेनकर यांनी शहरातील पाणीपुरवठय़ाची माहिती दिली, तसेच गटविकास अधिकारी जोशी व तहसीलदार सोनार यांनी भविष्यात 45 गावांना साधारणत: पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते त्या दृष्टीने नियोजन करावे लागले, असे सांगितले. भुजबळ फाउंडेशनमार्फत शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर येवला तालुक्यात दोन बंधार्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्याबाबत विचार विनीमय झाला. मौजे शिरसगाव, वळदगाव येथेही कामे घेण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील वीज मंडळाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या प्रसंगी ना. भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, बी.आर. लोंढे, तहसीलदार सोनार, गटविकास अधिकारी जोशी, तालुका कृषी अधिकारी कुळधर, वीज मंडळाचे उपअभियंता पाटील, जि.प. चे उपअभियंता गवारे, उशीर, न.पा. मुख्याधिकारी मेनकर, एस. टी. मंडळाचे अधिकारी, शहर पोलीस अधिकारी सोनवणे, तालुक्याचे पोलीस अधिकारी शिरसाठ, गटशिक्षण अधिकारी चौधरी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी बागूल, पाणीपुरवठा उपअभियंता क्षीरसागर व सा.बां. विभागाचे चौधरी आदी उपस्थित होते. |