येवला - शहरापासून सहा कि.मी.वर कोपरगाव रस्त्यावरील पिंपळगाव जलाल
येथील टोल नाक्यावर येवले शहर व तालुक्यातील सर्व चारचाकी वाहनांना टोल
माफी मिळावी, या मागणीचे निवेदन सर्वपक्षीयांच्या वतीने टोल नाक्यावरील
व्यवस्थापकास देण्यात आले. कोपरगाव रस्त्यावरील पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर शहर व तालुक्यातील सर्व वाहनांना टोलमुक्तकरावे, यासाठी काल येथील विश्रमगृहावर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. बैठकीत ठरल्याप्रमाणे आज टोल नाक्यावरील व्यवस्थापकास निवेदन देण्यात आले, तसेच या तालुक्याचे लोकप्रतिनिधी छगन भुजबळ हे 21 फेब्रुवारी रोजी येवला दौर्यावर येत असल्याने त्या दिवशी त्यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. राज्यातील अनेक ठिकाणी तालुक्यातील स्थानिक वाहनांना टोलनाक्यांनी टोलमुक्त केले आहे. त्या पाश्र्वभूमीवर या मागणीला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला आहे. या निवेदनाची 28 फेब्रुवारीपर्यंत दखल न घेतल्यास टोलमाफीविरुद्ध सर्वपक्षीय जनआंदोलन करतील, असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर भाजपाचे धनंजय कुलकर्णी, मनोज दिवटे, राम बडोदे, राष्ट्रवादीचे दीपक लोणारी, अविनाश कुक्कर, भूषण लाघवे, सुभाष गांगुर्डे, वैभव कदम, बाळासाहेब सोनवणे, विष्णू कर्हेकर, शिवसेनेचे भास्कर कोंढरे, राजेंद्र लोणारी, महेश सरोदे, दीपक भदाणे, कॉँग्रेस पक्षाचे एकनाथ गायकवाड, मनसेचे गौरव कांबळे, चेतन फुलारी, रितेश बूब, राजेश भंडारी, युवा सेनेचे रूपेश लोणारी, आरपीआयचे गुड्डू जावळे, तसेच नितीन जाधव, कुणाल परदेशी, पांडुरंग शेळके आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत. |