चाळीस
विद्यार्थ्यांसह सहलीचा आनंद लुटून महाबळेश्वरहून नाशिककडे निघालेल्या
एस.टी. बसला शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पाचगणीच्या घाटात
अपघात झाला. एस.टी.चे ब्रेक अचानक निकामी झाल्याचे लक्षात आल्याने चालकाने
प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या डाव्या बाजूला धडकविली. या अपघातात दोन
विद्यार्थी, चालकासह सहाजण जखमी झाले आहेत. या अपघाताची समजलेली अधिक माहिती अशी, नाशिक जिल्ह्यातील चिंचोडी (ता. येवला) येथील आदर्श महाविद्यालयाची सहल दोन एस.टी. बसेसमधून एकूण 80 विद्यार्थी शिक्षकांसह रायगड, महाबळेश्वरला पर्यटनासाठी आली होती. शुक्रवारी प्रतापगड, महाबळेश्वर पाहून रात्री सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. दोन्ही बसेस एका पाठोपाठ होत्या. त्यापैकी एक एस.टी. बस (क्र. एमएच-15-533) पाचगणी घाटातील नागेवाडी फाटय़ावरील वळणावर आल्यानंतर चालक जाधव यांना बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खडकाला धडकविली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघात झाला, त्यावेळी सर्वजण झोपेत होते. या अपघातात बारे, शिवाजी साताळकर हे शिक्षक, तर अमित कोकाटे, ऋतेश जाधव, पवन बयान हे विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यावर वाईच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. |