येवला - नगरसूल (ता. येवला) येथील विवाहित महिलेवरील बलात्कारप्रकरणी
तिघा संशयित आरोपींपैकी एकास पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता
त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित दोघा संशयितांना
अटक करण्यासाठी 8 पोलीस पथक रवाना झाली
आहेत; मात्र अद्याप कुठलेही धागेदोरे हाती लागले नाहीत. नगरसूल येथील एका
विवाहितेच्या घरात कौटुंबिक वाद सुरू होते. घरगुती वाद मिटविण्यासाठी गावचे
सरपंच प्रमोद मुरलीधर पाटील यांच्याकडे सदर महिलेने धाव घेऊन घरातील सर्व
हकीकत सांगितली. आपण हा वाद वकिलांमार्फत मिटवू, असे पाटील यांनी सांगितले.
सदर महिला मुलावर औषधोपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आली होती.
त्यावेळी सरपंचांनी सोन्या ऊर्फ संतोष किसन गंडाळ (वय 31) व किरण तागडे
यांना गाडीत सोबत घेऊन रुग्णालयात येऊन वकिलाकडे जायचे आहे, असे सांगून
महिलेला गाडीत बसविलेव येवला येथील पृथ्वी लॉजवर आणून सरपंच पाटील व सोन्या
गंडाळ यांनी आपल्याला धमकी देत बलात्कार केला असल्याचे सदर महिलेने
फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडली. संशयित वारंवार
त्रास देऊ लागल्याने सदर महिलेने जिल्हा पोलीसप्रमुख प्रवीण पडवळ यांची भेट
घेऊन तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या उपस्थितीत परवा बलात्काराचा गुन्हा
दाखल करण्यात आला. याबाबत गंडाळ यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता
पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उर्वरित दोघा संशयित आरोपींना
ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहे. अधिक तपास
पो.उ.नि. उमा गवळी करीत आहेत.