स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण वर्गाचा समारोप


येवला - श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित भाटगाव येथील विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात चार दिवस चाललेल्या स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण वर्गाचा समारोप नुकताच झाला. या कार्यक्रमास भाटगावचे सरपंच वसंत पवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत साबरे, संस्थेचे विश्वस्त भूषण लाघवे, कराटे प्रशिक्षक महेंद्र खराडे आदी उपस्थित होते. देशभरात स्त्रियांवरवरील अत्याचाराच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीसाईराज शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने महाविद्यालयीन युवतींसाठी निर्भय कन्या अभियानांतर्गत कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. दैनंदिन जीवनात घडणार्‍या गैरप्रकारांना धैर्याने सामोरे कसे जावे, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मुलींना देण्यात आले. स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी कायदा अपुरा पडत आहे. पोलीस यंत्रणाही दुर्घटना घडण्यापूर्वी सर्व ठिकाणी पोहोचण्यास अपुरी पडते. अशावेळी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन समर्थ बनणे, हाच एकमात्र उपाय असल्याचे मत वसंत पवार यांनी व्यक्त केले. देशाची राजधानी असलेले दिल्ली शहर बलात्कार्‍यांचे शहर बनत चालण्याची खंत साबरे यांनी व्यक्त केली. इंटरनेट, सोशल नेटवर्किग साईट, ब्ल्यू फिल्म्स, चित्रपटामधील अश्लील दृश्ये ही समाजात वासनांधता वाढीस लावत आहे. या सर्वावर नियंत्रण व्यवस्था निर्माण व्हावी, असे मत भूषण लाघवे यांनी व्यक्त केले. प्रा. ज्ञानेश्वर भगुरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. लक्ष्मीकांत शर्मा यांनी आभार मानले. मनीषा कुयटे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्राध्यापक कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.भाटगाव येथील कराटे प्रशिक्षण शिबिराचा समारोप
थोडे नवीन जरा जुने