ममदापूर येथे शेतकर्‍याचा सहा ट्रॅक्टर चारा जळून खाक


येवला तालुक्यातील ममदापूर येथे आग लागल्याने सहा ट्रॅक्टर चारा खाक झाला असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. जनार्दन बाबूराव वाघ हे गावाच्या शेजारी शेतात रहात असून, त्यांच्याकडे सात ते आठ जनावरे आहेत. या जनावरांसाठी त्यांनी शेतातील, तसेच रेंडाळे येथून सहा ट्रॅक्टर चारा घरा शेजारी एकत्र करून ठेवला होता; परंतु जनार्दन वाघ यांच्या घराच्या शेजारूनच विद्युतपुरवठा करणार्‍या तारा आहेत. त्या तारा एकत्र होऊन त्याचे शॉर्टसर्किट झाल्याने चार्‍याला आग लागली आणि विझवण्याचे प्रयत्न करण्याआगोदरच संपूर्ण चारा जळून खाक झाला. आग विझवताना वाघ यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे.चारा जळाल्याची बातमी कळताच गावातून लोकांनी धाव घेतली व पाण्याचा टँकरदेखील बोलावला; परंतु सर्वच प्रयत्न फोल ठरले. घटनेचा पंचनामा तलाठी पिंपळसे यांनी केला असून, साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहेत. यंदा दुष्काळ असल्याने चार्‍याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यात आशा प्रकारची हानी झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत. जळीताची बातमी कळताच जि.प. सदस्य प्रवीण गायकवाड, पं.स. सदस्य संभाजीराजे पवार, सरपंच किसन वनसे, सदस्य नारायण गुडघे, साहेबराव उगले, दत्तू वाघ, नवनाथ गुडघे, दत्तू गुडघे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
थोडे नवीन जरा जुने