येवला तालुक्यातील राजापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक
शाळेत बदली झालेले शिक्षक ढोकाडे अद्याप रुजू झाले नसल्याने पालकवर्गात
तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिक्षक मिळावेत म्हणून येथील पालकांनी दोन वेळेस कुलूप लावण्याचा इशारा दिला होता. गेल्या सहा महिन्यांपासून या शाळेतील तीन शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यांच्या जागी अद्याप कायमस्वरुपी शिक्षक मिळालेले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावत आहे. पं.स. शिक्षण विभाग मात्र मूग गिळून आहे. केंद्र शाळेत अशी परिस्थिती असेल तर तालुक्यात इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल हे अधिकार्यांनाच माहिती. येथे बदली झालेले शिक्षक पुन्हा राजकीय वजन वापरुन बदली करुन घेतील. असे प्रकार तालुक्यात नेहमी घडतात. याठिकाणी ढोकाडे नावाच्या शिक्षकांची बदली झाली असताना अद्याप रुजू का झाले नाही असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. शिक्षण विभागाचा शिक्षकांवर वचक राहिला नसल्याने शिक्षकाचा खेळखंडोबा होत आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अद्यापही इंग्रजीची ओळख नसून बर्याच विद्यार्थ्यांना बाराखडी येत नसल्याच्या तक्रारी आहे. राजापूर येथील प्राथमिक शाळेत त्वरित शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा पवित्रात पालक वर्गाने घेतला आहे. |