मुख्याध्यापकांचीच प्रशिक्षण शिबिराला दांडी कारवाई न झाल्यास शिक्षण विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा


येवला - बाभुळगाव येथील एसएनडी विद्यालयात काल नववर्षाच्या पहिल्या दिवशी सुरू झालेल्या मुख्याध्यापक प्रशिक्षण शिबिराला आज मुख्याध्यापकांनी दांडी मारली. पंचायत समिती पदाधिकार्‍यांनी प्रशिक्षण शिबिराला सकाळी १० वाजता भेट दिली असता प्रशिक्षण स्थळावर कुणीच हजर नव्हते. प्रशिक्षण शिबिराला उशिरा व गैरहजर राहणार्‍या मुख्याध्यापकांवर कारवाईचा इशारा जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी दिला आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी कारवाई न केल्यास उद्या गुरुवारी पंचायत समिती पदाधिकार्‍यांनी शिक्षण विभागालाच टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
बाभुळगाव येथे काल १ जानेवारीपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत तालुकास्तरीय मुख्याध्यापक प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे. सदर शिबीर ५ जानेवारीपर्यंत चालणार असून तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे २३७, माध्यमिक शाळांचे ४४ तर खासगी प्राथमिक शाळांचे १९ असे एकूण ३०० मुख्याध्यापक शिबिरात प्रशिक्षणासाठी सामील झाले आहेत. जिल्हा पातळीवर प्रशिक्षण घेतलेले तालुक्यातील ८ प्रशिक्षणार्थी तथा तज्ज्ञ मार्गदर्शक तालुक्यातील ३०० मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण वर्ग घेत आहेत.
प्रशिक्षणवर्गाला पदाधिकार्‍यांची भेट
आज प्रशिक्षण वर्गाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजताच पंचायत समिती सभापती राधिका कळमकर, उपसभापती हरिभाऊ जगताप, पंचायत समिती सदस्य संभाजी पवार, पोपट आव्हाड, रतन बोरनारे, भास्कर कोंढरे, वसंत पवार आदींनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रशिक्षण वर्गाची वेळ सकाळी १० ते ५ वाजेपावेतोची असताना शिक्षण विस्ताराधिकारी एस. एन. गायकवाड, गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक प्रशांत शिंदे व तज्ज्ञ मार्गदर्शक चंद्रकांत जानकर हे प्रशिक्षणस्थळी हजर होते. प्रशिक्षण शिबिरासाठीच्या पाच वर्गांना कुलूपच होते. दुपारी १२ वाजेपर्यंत पंचायत समितीचे पदाधिकारी प्रशिक्षणस्थळी हजर होते. १५४ मुख्याध्यापक यावेळी हजर झाले होते. पदाधिकार्‍यांनी लेटलतीफ मुख्याध्यापकांची हजेरी घेताना चांगलीच कानउघडणी यावेळी केली. लेटलतीफ मुख्याध्यापकांच्या एका हजेरी पुस्तकावर पदाधिकारी हजर होण्याची वेळ टाकून सह्या घेत होते व टाकलेली वेळही तपासून पाहत होते.
गटशिक्षणाधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस
पंचायत समिती पदाधिकार्‍यांच्या तक्रारीवरून गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी गटशिक्षणाधिकारी किसन चौधरी यांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. या नोटिसीत मुख्याध्यापक प्रशिक्षण शिबिरासाठी कुठलेही नियोजन केल्याचे दिसून येत नसून शासनाचा मुख्याध्यापकांना प्रशिक्षणदेण्याचा उद्देश सफल झालेला दिसून येत नाही. प्रशिक्षण शिबिराला तज्ज्ञ मार्गदर्शक गैरहजर होते. यामुळे २ जानेवारी रोजीचा प्रशिक्षण शिबिराचा खर्च आपल्या वेतनातून का कापण्यात येऊ नये याबाबत एक दिवसात लेखी खुलासा करण्याचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी नोटिसीत म्हटले आहे
थोडे नवीन जरा जुने