नगरसुलात मुदत संपलेली औषधे आढळली बेवारस स्थितीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राने हात झटकले


येवला  - नगरसूल-राजापूर रस्त्यावर भगत वस्तीजवळ रस्त्यालगतच आज सकाळी मुदत संपलेली औषधे बेवारस स्थितीत फेकून दिल्याचे आढळून आले. सदरच्या औषधांचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान नगरसूल येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राने बेवारस औषधांबाबत हात झटकल्याने या प्रकाराबाबत गूढ निर्माण झाले आहे.
येवला-नांदगाव महामार्गावर नगरसूलपासून एक किलोमीटर अंतरावर राजापूरकडे जाणार्‍या रस्त्यावर बेवारस स्थितीतील फेकून दिलेली औषधे जिल्हा परिषद सदस्य साईनाथ मोरे यांच्या निदर्शनास आली. मोरे यांनी ही घटना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भ्रमणध्वनीवरून कळवली. रस्त्याच्या कडेला सन २००५ व २००६ ला मुदत संपलेली ही सर्व प्रकारची औषधे होती. यात कानात टाकावयाचे ड्रॉप्स, त्वचेचे मलम विटॅमिन व हिमोग्लोबिनच्या गोळ्या, कॅप्सूल आदींचा समावेश होता. नगरसूल येथे दोन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे असून ही दोन्हीही उपकेंद्रे सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियंत्रणाखाली आहेत. सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.आर.कांबळे यांनी घटनास्थळावर माहिती मिळताच आरोग्य सहाय्यक आर.एल.पात्रे व परिचारिकांना पाठविले. सदर औषधे ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांनी म्हटले आहे. सदर औषधांवर फिजिशिएन सॅम्पल लिहिलेले असल्याने कुठल्या खासगी डॉक्टर वा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने टाकले असावे व त्याचा हेतू काय असावा याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
औषधे कुठलीही असोत, बेवारस स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची औषधे फेकण्याचा प्रकार हा जीवघेणाच आहे. मुदत संपलेली औषधे फेकण्याऐवजी संबंधितांनी जाळून नष्ट करावयास हवी होती. सदर औषधे लहान मुलांनी अथवा अज्ञात इसमांनी घेऊन वापरली असती तर त्याचे परिणाम घातक ठरले असते. बेवारस स्थितीत औषधे फेकण्याबाबत आपण जिल्हा परिषदेच्या सभेत हा गंभीर मुद्दा उठविणार आहोत.
- साईनाथ मोरे, जिल्हा परिषद सदस्य, नगरसूल
प्राथमिक आरोग्य केंद्रांना जो औषधांचा पुरवठा होतो, त्यावर गव्हर्नमेंट सप्लाय म्हणून शिक्का असतो. त्यामुळे बेवारस फेकलेल्या औषधांशी आरोग्य केंद्राचा कुठलाही संबंध नाही. मी स्वत: ही औषधे बघितली आहेत.
- डॉ.डी.पी.नाईकवाडी, तालुका वैद्यकीय अधिकारी.
थोडे नवीन जरा जुने