पारेगावच्या शेतकरी पाणी टँकरच्या पाण्यावर जगवतोय कांदा पीक

येवला - दुष्काळाशी सामना करायची जणु काही तालुक्यातील शेतकर्‍यांना आता सवयच झाली आहे. वरुणराजाच्या दरवर्षीच्या अवकृपेने शेती कशी करायची हा सातत्याने उद्भवणार्‍या प्रश्‍नाला तोंड देण्याची सवय शेतकरी स्वत:हून करून घेऊ लागला आहे. या वर्षी तर डिसेंबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्याने आता रब्बी हंगामात जगवलेल्या पिकांना टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे.
पारेगाव येथील शेतकरी पोपट वामन पोटे यांची एकूण सात एकर शेती आहे. मात्र विहिरीला पाणीच कमी असल्याने या वर्षी तर रब्बीचा हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. शेती असूनही केवळ पाण्याच्या कमतरतेमुळे पिकवता येत नाही अशी गत आता तालुक्यातील शेतकर्‍यांची होऊ लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात पोपट पोटे यांनी केवळ ३० गुंठे क्षेत्रात लाल कांद्याचे पीक लावले आहे. त्यावेळी विहिरीला थोड्या फार प्रमाणावर पाणी असल्याने कांद्याचे एवढे क्षेत्र का होईना येईल अशी भाबडी आशा पोटे यांना होती, मात्र ती फोल ठरली. एरवी एकराने कांदा पिकांची लागवड करणार्‍या शेतकर्‍याप्रमाणेच पोपट पोटे हे कांद्याचे पीक घेण्यासाठी गुंठ्यावर आले. मात्र आता पाणीच नसल्याने गुंठ्याने कांदा पीक कसे घ्यायचे या विवंचनेत पोटे कुटुंबीय आहे.
तीन आठवड्यांपासून टँकरचे पाणी
गेल्या तीन आठवड्यांपासून टँकरने विकतचे पाणी आणणे पोपट पोटे यांनी सुरू केले आहे. स्वत:चा घरचा टँकर असल्याने डिझेल व विकत पाण्यावर त्यांचा दररोज १००० रुपये खर्च होत आहे. ५ हजार लिटरच्या एका टँकरला खासगी विहिरीवरून पाणी भरण्यासाठी १५० रुपये विहीर मालकाला द्यावे लागत आहे. दिवसातून पाच टँकरच्या खेपा आणून हे पाणी विहिरीत टाकून मगच पोटे कुटुंबीय कांद्याला पाणी देत आहे. दिवसाला ट्रॅक्टरला ५ लिटर डिझेल लागत आहे. बाभुळगाव येथील खासगी विहिरीवरून पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आणखी एक महिन्यानंतर सदर लाल कांद्याचे पीक निघेल, मात्र तोपर्यंत दररोज टँकरच्या पाण्याची कसरत करावी लागणार आहे.
५ हजार लिटरला ५०० तर १२ हजार लिटरच्या टँकरला १८०० रुपये
सध्या टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. पिण्याच्या पाण्याची भ्रांत एकीकडे असताना जनावरांसह लागवड केलेल्या पिकांसाठी सध्या टँकरची चलती आहे. ५ हजार लिटरच्या टँकरला ५०० रुपये तर बारा हजार लिटरच्या टँकरला १० कि.मी. अंतरापर्यंत १८०० रुपये मोजावे लागत आहेत. १० किमीच्या पुढे जसे अंतर असेल तसे टँकरचे दरही वेगवेगळे आहेत. पाणी विक्रीसाठी आता टँकर विकत घेण्याचे प्रमाणही तालुक्यात वाढले असून काही शेतकरी तर स्वत:लाच पाण्यासाठी टँकर बनवून घेताना दिसत आहे. स्वत:चा ट्रॅक्टर व टँकर असल्यास फक्त खासगी विहिरीवरून टँकर भरून घेण्यासाठी प्रति टँकर १५० रुपये द्यावे लागत असल्याने आता कायमस्वरूपी दाराबाहेर ट्रॅक्टरबरोबर टँकर ठेवणेही शेतकर्‍यांची दुष्काळग्रस्त येवले तालुक्यात एक सवय बनली आहे.
 
थोडे नवीन जरा जुने