येवला - कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिरात काल झालेल्या चोरी
प्रकरणी पोलीस पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत; मात्र अद्याप कुणालाही अटक
करण्यात आलेली नाही. कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिरात चोरी
प्रकरणात दानपेटीतील अंदाजे 90 हजारांची रोकड व देवीच्या मुकुटावरील सहा
किलो वजनाच्या तीन चांदीच्या आकर्षक नक्षीदार छर्त्या 3 लाख 60 हजार रुपये
किमतीचा असा एकूण साडेचार लाखांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी नाशिक
स्थानिक गुन्हा शाखेचे पो.उ.नि. योगेश खेडकर, बैरागी, आवारे, पो. नि.
श्रावण सोनवणे, अभिमन्यू आहेर यांचे पथक काल कोपरगाव तालुक्यातील करंजी,
पढेगाव, संवत्सर आदी ठिकाणी तपासकामी गेले होते, तसेच मनमाड, मालेगाव,
नाशिक येथील पोलीस पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. नाशिक जिल्हय़ातील सर्व
पोलीस ठाण्यांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, नाशिक सराफ असो. अध्यक्ष
व दुकानदारांना चोरीच्या वस्तू घेऊ नका, आरोपींचे व वस्तूंचे वर्णन देऊन
असे आढळून आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे दिलेल्या
पत्रात कळविले आहे. तसेच सीसीटीव्हीद्वारे मिळालेली चित्रफित नाशिक, नगर,
औरंगाबाद, धुळे, जळगाव आदी ठिकाणच्या स्थानिक गुन्हे शाखांना देण्यात आली
आहे. चित्रफितमध्ये चोरी करताना दिसत असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक करावी,
असे ट्रस्टचे रावसाहेब कोटमे यांनी म्हटले आहे.