राजापूर प्राथमिक शाळेस मिळणार सहा महिन्यांनी शिक्षक?


येवला तालुक्यातील राजापूर येथील शाळेत शिक्षकाची बदली होऊन शिक्षक हजर होत नसल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 21 जानेवारी रोजी सकाळी गटशिक्षणाधिकारी चौधरी व विस्ताराधिकारी संजय कुसाळकर यांच्या उपस्थितीत राजापूर शाळेवर शिक्षक रुजू करणार आहे. राजापूर प्राथमिक शाळेत गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षक नाही, शिक्षकांच्या नियुक्त्या या शाळेवर झाल्यावर पं.स.चे काही पदाधिकारी ढवळाढवळ करून त्या शिक्षकाची राजापूर येथे झालेली बदली रद्द करतात. बदली रद्द होण्याअगोदर राजापूर गणातील पं.स. सदस्य पोपट आव्हाड यांच्याकडे आदेशाची प्रत राहते, आज ना उद्या शिक्षक हजर होईल म्हणून वाट पाहिली जाते अन् त्या शिक्षकाची दोन-चार दिवसांत पुन्हा बदली होते. या प्रकारामुळे पं.स. सदस्य पोपट आव्हाड यांनी आक्रमक होऊन थेट जिल्हा परिषद गाठली अन् शिक्षकांबाबतीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना बदली संदर्भात चर्चा केली म्हणून 21 जानेवारी रोजी पं.स.चे शिक्षण विभागाचे अधिकारी राजापूर येथे उपस्थित राहणार आहेत. आदेश झालेले शिक्षक हजर न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे समजते. 12 डिसेंबर 2012 मध्ये ठोकाडे नावाच्या शिक्षकाची येथे बदली झाली होती; मात्र काही सदस्यांनी ढवळाढवळ करून त्यांची बदली रद्द केल्या. 1 महिना आदेश देऊन हे शिक्षक रुजू झाले नाही. त्यांच्यावर कोणतेही कारवाई नाही. त्यामुळे शिक्षण विभागात चाललेल्या कारभारासंदर्भात पालक वर्गात संताप व्यक्त होत आहे. शिक्षण विभागात राजकीय नेत्यांनी राजकारण करू नये, अशी जनतेची अपेक्षा आहे. राजापूर जिल्हा परिषद गटात शिक्षक संख्या कमी आहे. या गटात शिक्षकांची बदली झाली तर त्यांना भीतीचे वातावरण दाखवून त्यांची येथून बदली केली जाते, असे अनेक वेळा घडलेले आहे. 21 जानेवारी रोजी राजापूर शाळेत शिक्षक रुजू न झाल्यास पं.स. सदस्य पोपट आव्हाड शाळेला कुलूप ठोकणार आहे. ज्या शिक्षकांची बदली येथे झाली आहे ते शिक्षक येथे हजर व्हावे, अन्यथा शाळेला ग्रामस्थ कुलूप लावणार आहेत.
थोडे नवीन जरा जुने