नगरसूल येथील घनामाळी मळा वस्तीवरील जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. तब्बल तीनतास घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. अखेर संध्याकाळी गटविकास अधिकार्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. घनामाळी मळ (नगरसूल) येथील जि.प. प्राथमिक शाळेला गेल्या वर्षभरापासून एकच शिक्षक असून या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग भरविले जातात. या शाळेत सुमारे 52 विद्यार्थी शिक्षण घेत असून अपुर्या शिक्षक संख्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे पालकांनी शिक्षक मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी पं.स.च्या शिक्षण विभागाला तक्रार अर्ज, निवेदने दिली; परंतु शिक्षण विभागाने अर्जाना केराची टोपली दाखवून दुर्लक्ष केले. यामुळे पालकांनी संबंधित शाळेला दोनवेळा कुलूपही ठोकले. तरीही दखल न घेतल्याने अखेर आज (दि.15) पालकांसह विद्यार्थ्यांनी येवला पंचायत समिती कार्यालयावर घोषणाबाजी करत मोर्चा काढला. तब्बल दोन तास गटविकास अधिकार्यांचे कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत ठिय्या दिला. तरीही कोणताही संबंधित अधिकारी न फिरकल्याने विद्यार्थ्यांनी अधिकारी वर्गाच्या बाहेर शाळा भरविली. वरिष्ठांना कल्पना देवूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांच्या संतापात अधिकच भर पडली. यावेळी विद्यार्थी संबंधित अधिकारी मुर्दाबादच्या घोषणाबाजी करू लागल्याने पं.स. आवार दुमदुमून गेले. या मोर्चाची आधीच कुणकूण लागल्याने पाणीपुरवठा पाहणीच्या नावाखाली गटविकास अधिकार्यांनी तर गटशिक्षण अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी आपापले भ्रमणध्वनी संच बंद करून पळ काढला. संध्याकाळपर्यंत संबंधित अधिकारी कार्यालयात फिरकलेच नाही. अखेर पालकांनी तहसीलदार हरिष सोनार यांना निवेदन देवून तक्रारीची दखल घेण्याची मागणी केली. तत्पूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर कोंद्रे, जि.प. सदस्य बाळासाहेब गुंड, पं.स. सदस्य रतन बोरणारे, वसंत पवार यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थी व पालक यांच्याशी चर्चा करून तीन दिवसात संबंधित शाळेला शिक्षक उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले; परंतु आंदोलनकत्र्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन देण्याची मागणी केली असता शिक्षण विभागातच जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने मोठी पंचाईत झाली. अखेर गटविकास अधिकार्यांनी समक्ष येवून आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन तहकूब केले. आंदोलनात नवनाथ बागल, धनाजी पैठणकर, सुंदरलाल पैठणकर, संजय पैठणकर, नवनाथ पैठणकर, गोरख पवार, दिलीप पैठणकर आदी पालकांसह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. |