येवल्यात भिषण अफघात..........ट्रकखाली चिरडून एकाच कुटुंबातील तिघे ठार


येवला- मनमाड रोडवरील जिल्हा बँकेसमोर ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात मोटारसायकलवरील पती-पत्नी व मुलगा हे तिघे जण जागीच ठार झाले. ते ठाणगाव (ता. येवला) येथे अंत्यविधीसाठी जात असताना आज सकाळी आठच्या दरम्यान हा अपघात घडला.

बाबूराव नामदेव आहेर (वय 60), पत्नी सुमनबाई बाबूराव आहेर (वय 55) व मुलगा राहुल बाबूराव आहेर (वय 22, सर्व रा.एरंडगाव, ता.येवला) हे तिघे एरंडगाव येथून ठाणगाव येथे जाण्यासाठी मोटारसायकल (क्र. एमएच 15 सी 2676) वरुन निघाले. ठाणगाव येथे बाबूराव आहेर यांच्या सख्ख्या मावशीचे निधन झाले होते. मावशीच्या अंत्यविधीसाठी तिघेही मोटारसायकलवरून जात असताना मनमाड रोडवर जिल्हा बँकेसमोर कोपरगावकडून मनमाडकडे जाणार्‍या ट्रकला (क्र. यूपी 25-8540) दुसरी ट्रक ओव्हरटेक करून पाठीमागून येऊन डिव्हायडरच्या बाजूने निघाली. यूपीच्या ट्रकने दुसर्‍या ट्रकला साईड देत असताना बाजूने रोड पट्टय़ाकडून मोटारसायकल जात होती. त्या दरम्यान मोटारसायकलला कट मारला गेला. क्लिनर बाजूने मोटारसायकलची डिक्की ट्रकच्या मागील चाकात अडकल्याने तिघेही जण मागच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाले. त्यानंतरही ट्रकने मागच्या चाकात अडकलेली मोटारसायकल मार्केट कमिटी गेटपर्यंत सुमारे 200 फूट ओढत नेली. फत्तेसिंग सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी पळून जाणार्‍या ट्रकला अडविले. अपघातानंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात एरंडगाव येथे तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत बाबूराव आहेर हे एरंडगाव येथे कुटुंबासह शेती करत होते. बाबूराव यांना तीन मुली व दोन मुले होती. तिघा मुलींचे विवाह झाले होते, तर दोघा मुलांचा विवाह होणे बाकी होते. राहुल हा लहान मुलगा होता. मावशीच्या अंत्यविधीसाठी जाणार्‍या या तिघांवरच काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स.पो.नि. पांडुरंग खेडकर करीत आहेत. अपघातग्रस्त ट्रक व चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
थोडे नवीन जरा जुने