येवला - स्वस्त धान्य दुकानांमधून दारिद्य्ररेषेखालील व अंत्योदय कार्डधारकांची सध्या चांगलीच परवड होत आहे. गेल्या ६ महिन्यांपासून गोडेतेलाचे दर्शनच नाही. स्वस्त धान्य दुकानांमधून कुठल्याही गावात साखर मिळत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. पंचायत समिती सदस्य संभाजी पवार यांनी १० जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार हरीश सोनार यांना दिला आहे.
तालुक्यातील अनेक कुटुंबीयांचे गेल्या ९ महिन्यांपासून रेशनकार्डाची प्रकरणे सेतू कार्यालयात प्रलंबित आहेत. २ रुपये किलोप्रमाणे बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना मिळणारा तांदूळ व गहू रेशनकार्डधारकांना दरमहा मिळत नाही. रेशनचे दरमहा जे वाटप कार्डधारकांना केले जाते त्याच्या कुठल्याही नोंदी रेशनकार्डांवर नाहीत. मनमाड येथील एफ.सी.आय.मधून निघणारा माल पूर्णपणे येवल्याच्या गोडाऊनमधूनपर्यंत पोहोचतच नाही. या मालाची बाहेरच विल्हेवाट लावली जाते. जातीच्या दाखल्यांसाठी नागरिकांना दोन-दोन महिने तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात. उत्पादनांच्या दाखल्यांसाठी नेहमीच कार्यालयातील कर्मचार्यांकडून चालढकल केली जाते. आदी अनेक तक्रारी संभाजी पवार यांनी निवेदनाद्वारे दिल्या आहेत. तहसील कार्यालयात सुरू असलेल्या गैरकारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त असून संबंधितांची चौकशी करून कारवाईची मागणीही या निवेदनाद्वारे पवार यांनी केली आहे.
शहरात १६ तर ग्रामीण भागात १२३ असे एकूण १३९ स्वस्त धान्य दुकाने येवला तालुक्यात आहेत. घरपोच योजनेंतर्गत स्वस्त धान्य दुकाने आहेत. ४१ स्वस्त धान्य दुकानेही महिला बचत गट व विविध सहकारी संस्थांमार्फत चालविण्यात येतात. शहर व तालुक्यात १४ हजार ५५१ बीपीएल कार्डधारक, १० हजार २१० अंत्योदय तर २३ हजार ६९ हे केशरी कार्डधारक आहे. एकूण कार्डधारकांची संख्या ४७ हजार ८३० इतकी आहे. बीपीएल धारकांसाठी डिसेंबर महिन्यात २ हजार ९१० क्विंटल गहू, २ हजार १८२ क्विंटल तांदूळ, अंत्योदय कार्डधारकांसाठी २ हजार ३९ क्विंटल गहू, १ हजार ५३१ क्विंटल तांदूळ तर केशरी कार्डधारकांसाठी २ हजार ३०४ क्विंटल गहू व १ हजार १५३ क्विंटल तांदूळ मंजूर करण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.