सभापतींच्या तंबीनंतर भुसार लिलाव सुरळीत

अंदरसूल उपबाजार आवारात काही परवानाधारक व्यापार्‍यांनी भुसार धान्याची खरेदी लिलावात सहभागी न होताच सुरू केल्याने याच उपबाजार आवारातील इतर व्यापार्‍यांनी उपबाजार आवार बंद करण्याचा इशारा बाजार समितीच्या सचिवांना दिला होता. या घटनेची तत्काळ दखल नूतन सभापती डॉ. सुधीर जाधव व संचालक मंडळाने घेतली. उपबजार आवारावर जाऊन हस्तक्षेप करीत भुसार धान्याचे लिलाव पुन्हा सुरळीत केले.
उपबाजार आवारातील परवानाधारक व्यापारी गोरख सेंद्रे यांनी सकाळी बाजार समितीचे सचिव डी.सी. खैरनार यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत उपबाजार आवार बंद पाडण्याचा इशारा दिला होता. येथील उपबाजार आवारातील काही परवानाधारक व्यापारी परस्पर लिलावात सहभाग न घेता मक्याची खरेदी करीत होते ही घटना इतर व्यापार्‍यांना कळताच त्यांनी उपबाजार आवार बंद करण्याचा निर्णय घेतला व बाजार समिती सचिवांना हा निर्णय दूरध्वनीवरून कळविला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बाजार समितीचे सभापती डॉ. सुधीर जाधव, संचालक शिवाजी वडाळकर, शरद लहरे, सचिव डी. सी. खैरनार यांनी उपबाजार आवारावर जाऊन परवानाधारक व्यापार्‍यांची बैठक घेतली. जाधव यांनी बैठकीत व्यापार्‍यांना परस्पर भुसार धान्य मालाची खरेदी केल्यास परवाना त्वरित रद्द करण्यासह ११ हजार रुपये दंड करण्याचा इशारा दिला.
व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या मालाची परस्पर खरेदी केल्यास शेतकर्‍यांचे हित जोपासले जात नाही. शेतकर्‍यांच्या मालाच्या पैशांची जबाबदारी कुणाची राहत नसल्याने ही शेतकर्‍यांची फसवणूक आहे, असे ठाम मत जाधव यांनी यावेळी मांडले. लिलावात सर्व परवानाधारक व्यापार्‍यांना सहभागी होऊन मालाची खरेदी करावी लागेल व मार्केट फी रीतसर द्यावी लागेल, असा इशारा सभापतींनी दिल्यानंतर सर्वच व्यापार्‍यांनी लिलावाला सुरुवात केली. बाजार समितीनेही प्रत्येक व्यापार्‍यांच्या खळ्यांवर हमाल व माथाडी कामगारांना पाठवून हमाली व तोलाई देण्याच्या सूचना व्यापार्‍यांना दिल्याने हमाल मापार्‍यांनी सभापतींच्या निर्णयाचे स्वागत केले.
थोडे नवीन जरा जुने