सावरगावात लेक वाचवा अभियानाअंतर्गत जनजागृती

‘जन्म तिला घेऊ द्या, सुंदर जग पाहू द्या’ हे पथनाट्य सादर करीत लेक वाचवा अभियानाअंतर्गत एस.एन.डी. नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सावरगावकरांचे लक्ष वेधले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अभियानाअंतर्गत सावरगावात हजार मुलांमागे १५३ मुली कमी असल्याची जनजागृतीही गावकर्‍यांना यावेळी करून देण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगाव व एस.एन.डी. नर्सिंग महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गावातून न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची रॅली काढण्यात आली. रॅलीत स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी सामील झाले होते. ‘मुलगीच आहे आयुष्याचा ठेवा, मग वंशासाठी मुलगाच का हवा’, ‘दिवा जन्माला घालण्यासाठी, पण तिला जन्म घेऊ द्या’, ‘आज मुलीचा जन्म घोटून, उद्या सून आणाल कोठून’, ‘स्त्रीजन्माचा दीप लावा, घरोघरी, आकाशातील नक्षत्र येतील भूवरी’ आदी फलकांनी गावकर्‍यांचे लक्ष वेधून गेले. रॅलीच्या समारोपानंतर एस.एन.डी.नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मारोतराव पवार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून एस.एन.डी. नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य विनयकुमार, सरपंच वाल्ह्याबाई पवार, पंचायत समिती सदस्य संभाजी पवार, कमलाबाई साहेबराव पवार, ट्रस्टचे सचिव बी.एन.सोनवणे, छगन गोविंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कांबळे यांनी केले. सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलीचे स्वागत एक हजार एक रुपयांचा धनादेश देऊन करण्यात येईल, अशी घोषणा कमलाबाई पवार ट्रस्टचे संस्थापक संभाजी पवार व सचिव बी.एन.सोनवणे यांनी यावेळी केली.
थोडे नवीन जरा जुने