अतिक्रमित जागेवर कपाऊंड उभारणीस प्रारंभ

 बेकायदेशीर गाळय़ांचे बांधकाम पाडण्याचे काम पूर्ण होऊन त्याचा मलबा उचलण्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत मलबा व मुख्य नाला साफ करण्याची मोहीम पालिका उद्या राबविणार आहे. ज्या जागेवरील अतिक्रमण काढले त्या जागेवर तार कंपाऊंड उभारण्याचे काम पालिकेने सुरु केले आहे.
सदर जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून सदर जागा तात्पुरते स्वरुपात वाहनतळासाठी वापरता येईल, अशी माहिती मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून स.न. 3907 व 3908 वरिल बेकायदेशीर अतिक्रमीत बांधकामे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हटविण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली होती. किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत मोहीम राबविली. बांधकामाचा मलबा देखील उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते. नाल्यामधील गाळ व मलबा काढण्यासाठी उद्या नगरपालिका मोहीम राबविणार आहे. आजही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल होता. अतिक्रमित रस्ते बंद करुन परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. तहसीलदार हरिष सोनार, पोलीस निरीक्षक श्रावण सोनवणे, सुरेंद्र शिरसाठ हे परिस्थिवर नियंत्रण ठेऊन होते. अनेक गाळेधारकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. गाळे पाडतांना अनेक गाळेधारकांचे डोळे पाणावले होते. रोजीरोटीचा प्रश्न आज उभा राहिला आहे. छोटय़ा व्यावसायिक तर अधिक विवंचनेत दिसत आहे. नव्याने व्यापारी संकुल झालेच तर गाळे घेण्यासाठी पैसे आणायचे कोठून तेव्हा पालिकेने गोरगरीब विस्थापित गाळेधारकांना विना अनामत रकमेचे गाळे भाडेतत्त्वावर द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महसूल, पोलीस, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी सहकार्य केल्याबद्दल मुख्याधिकारी मेनकर यांनी सर्वाचे आभार मानले.
थोडे नवीन जरा जुने