येवले तालुक्यात २२ हजार आधार कार्ड नोंदणी

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली आधारकार्ड नोंदणीची मोहीम शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी अपुरी पडू लागल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. शहरात प्रभागनिहाय केंद्र निर्माण करण्याची मागणी शहरवासीयांनी तहसीलदारांकडे केली आहे. मागील वर्षासह यंदाच्या दुसर्‍या टप्प्यात सुरू असलेल्या मोहिमेत आजपावेतो केवळ २२ हजार नागरिकांनी आधारकार्डांसाठी नोंदणी केल्याची माहिती तहसीलदार हरीश सोनार यांनी दिली आहे.
मागील वर्षी जून २०११ मध्ये आधारकार्ड नोंदणीच्या पहिल्या टप्प्याला शहर व तालुक्यात सुरुवात करण्यात आली होती. सहा महिने ही मोहीम चालली होती. या वर्षी पुन्हा ऑक्टोबर महिन्यापासून दुसर्‍या टप्प्याला सुरुवात करण्यात आली असून पालिका कार्यालयात आधारकार्डांची नोंदणी सुरू करण्यात आली होती. कार्व्ही कंपनीमार्फत सुरू असलेल्या आधारकार्डांच्या नोंदणीसाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केल्याने प्रभागनिहाय मोहीम राबविण्याची मागणी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. शहरात २३ वॉर्डांमधील ६ प्रभागांत एकाच वेळेस ही मोहीम राबविल्यास आधारकार्ड नोंदणी यशस्वीपणे पार पडेल असेही मनसेने निवेदनात म्हटले आहे. आधारकार्डांची नोंदणी करताना प्रत्येक नागरिकाच्या दोन्ही हातांच्या बोटांचे ठसे व दोन्ही डोळ्यांच्या बुब्बुळांचे छायाचित्र घेण्यात येत असल्याने एका नागरिकाच्या नोंदणीसाठी प्रत्येक पाच मिनिटांचा अवधी लागत आहे. सध्या शहरातील आधारकार्डांची नोंदणी बंद करण्यात आली असून कार्व्ही एजन्सीमार्फत आजपावेतो सायगाव व पिंपळगाव जलाल या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी २ युनिटस् नोंदणीसाठी सुरू करण्यात आली आहे. परिसरातील गावांमधील नागरिक या ठिकाणी आधारकार्डाची नोंदणी करणार आहेत.
पाच वर्षे वयावरील नागरिकास बंधनकारक
आधारकार्डाच्या नोंदणीसाठी वय वर्षे पाचवरील नागरिकाला आधारकार्ड नोंदणी बंधनकारक आहे. रहिवाशी व ओळखीच्या पुराव्याचा दाखला आधारकार्ड नोंदणी करताना अत्यावश्यक आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सदर मोहीम राबविण्याच्या सूचना एजन्सींना देण्यात आल्या असल्या तरी एजन्सींमार्फत सकाळी १० वाजता मोहिमेला सुरुवात करून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोहीम सुरू ठेवण्यात येत आहे.
आधारकार्ड योजनेसाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०१३ पर्यंत आहे. एजन्सींना युनिटची संख्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्व्ही व ट्रान्सलाइन एजन्सीमार्फत शहर व तालुक्यात काम सुरू आहे. नागरिकांनी स्वत:हून आधारकार्डची नोंदणी करून घ्यावी.
- हरीश सोनार, तहसीलदार
थोडे नवीन जरा जुने