पालखेड डाव्या कालव्याला मनमाड व येवला शहरासाठी सोडण्यात आलेल्या
पिण्याच्या पाणी आवर्तनातून तालुक्यातील 20 बंधारे भरून देण्यात यावे, अशी
मागणी पंचायत समिती सदस्या शिवांगी पवार यांनी सोमवारी जिल्ह्याचे
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पाटबंधारे विभागाकडून पालखेड डाव्या कालव्याला 28 डिसेंबरपर्यंत आवर्तन सुरू राहणार आहे. त्यातून येवला शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव व तालुक्यातील 38 गाव नळपाणी पुरवठा योजनेचा तलाव भरण्यात येणार आहे. अत्यल्प पर्जन्यामुळे तालुक्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. कूपनलिकांचेही पाणी आटले आहे. केवळ उन्हाळ्यात जनावरांच्या चार्यांची तरतूद म्हणून पिके शेतात उभी आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत पाटबंधारे विभागाने बंधारे भरून दिल्यास आगामी चार महिन्यांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, परिणामी प्रशासनाला टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. |