अंदरसुलच्या बँक ऑफ बडोद्याने केला ग्राहकांची दिवाळी चा विचका

अंदरसुल परिसरातील बँक ऑफ बडोद्याच्या ग्राहकांची दिवाळीच ‘कडू’ झाली आहे. बँकेत दिवाळी सणाच्या निमित्ताने खात्यावरील स्वत:चे पैसे काढण्यासाठी आलेल्या बँकेच्या ग्राहकांना बँकेत पैसे नसल्याने रिकाम्या हातानेच घरी परतावे लागले. पंचायत समिती सभापती राधिका कळमकर यांनी नासिक येथील बँकेच्या व्यवस्थापकांकडे शाखेविषयी तक्रार केली आहे. कामकाजात सुधारणा न झाल्यास बँकेच्या शाखेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या अंदरसुल येथील बँक ऑफ बडोदा येथे अंदरसुलसह उंदिरवाडी, बोकटे, देवळाणे, दुगलगाव, तळवाडे, सुरेगाव रस्ता, सायगाव, खामगाव, भुलेगाव आदी गावांमधील ग्राहकांचे व्यवहार शाखेत आहेत. अंदरसुल येथे एकच राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा असल्याने बँकेतील ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांची बदली झाल्यानंतर बँकेतील व्यवहाराच्या सेवेवर परिणाम झाला आहे. बँकेला १३ नोव्हेंबरपासून सलग तीन दिवस सुट्ट्या सुरू झाल्याने शाखेत सोमवारी सुमारे २०० च्या आसपास ग्राहकांनी दिवाळी सणासाठी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. नव्याने आलेले बँक व्यवस्थापक सुरेश जोशी हे २० दिवसांपासून रजेवर आहेत. सहाय्यक व्यवस्थापक प्रशांत रंजन व कॅशियर बापू गायकवाड हे दोघे कर्मचारी हजर होते. सकाळी ११ वाजता बँकेचे व्यवहार सुरू झाल्यानंतर अवघ्या तासाभरात काही ग्राहकांना हजाराच्या आसपास खात्यावरील रकमा मिळाल्या. मात्र त्यानंतरच्या ग्राहकांना रंजन यांनी बँकेत पैसे शिल्लक नसल्याचे उतारे देण्यास सुरूवात केली. ग्राहकांनी पैशांविषयी रंजन यांना विचारणा केली असता ‘खाते बंद करा, एवढे पैसे काढता कशाला, येथे पैसे छापले जातात का’ असे अवमानकारक उत्तर दिले. संतप्त ग्राहकांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच स्टेट बँकेतून पैसे येण्यास उशीर होत असल्याचे कारण देण्यात आले. दुपारी तीन वाजेनंतर ग्राहकांनी बँकेतून काढता पाय घेत रिकाम्या हाताने घरी गेले. काही गरजू ग्राहक बँकेत बँकेची वेळ संपल्यानंतरही तळ ठोकून होते. अखेर सायंकाळी पावणेपाच वाजता स्टेट बँकेतून कॅश आल्यानंतर मोठ्या खातेदार व व्यापारी वर्गाला बँकेच्या शाखेतून पैशांचे वाटप करण्यात आले.
बँकेच्या व्यवहाराविषयी आम्हाला तुम्ही विचारू शकत नाही. तुम्हाला काय छापायचे ते छापा. २०० ग्राहक बँकेत कधीच आलेले नाहीत. ग्राहकांना आम्ही पैसे दिले आहेत.
प्रशांत रंजन, सहाय्यक व्यवस्थापक अंदरसुल बँक
बँकेचे व्यवहार असुरळीत झाले आहेत. दिवाळी सण असताना बँकेच्या शाखेत पैसे नसणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बँकेच्या शाखेत कर्मचार्‍यांची संख्याही अपुरी आहे. वरिष्ठांनी तत्काळ लक्ष घालून कामकाजात सुधारणा न केल्यास बँकेच्या शाखेला कुलूप ठोकू.
राधिका कळमकर, सभापती, पंचायत समिती.
थोडे नवीन जरा जुने