मका खरेदीत केलेली मार्केट फीची वसुली कायदेशीरच

बाजार समितीने पाटोदा व अंदरसुल उपबाजार आवाराअंतर्गत येणार्‍या परवानाधारक व्यापार्‍यांवर धाडी टाकून मका खरेदीत केलेली मार्केट फीची वसुली कायदेशीरच होती. बाजार समितीची निर्मिती ही शेतकरी हितासाठी असून खाजगी बाजार समिती कुणीही निर्माण करू शकत नाही याची माहिती बाजार समिती सभापती नरेंद्र दराडे यांनी दिली आहे.
दीपावलीपूर्वी मुख्य बाजार समितीने अंदरसूल व पाटोदा येथील उपबाजार आवारावर मका खरेदी सुरू न केल्याने येथील परवानाधारक व्यापार्‍यांनी खाजगीरीत्या मका खरेदी सुरू करून शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक सुरू केली होती. बाजार समितीने सभापती, उपसभापती, सचिव व काही संचालकांचे एक पथक तयार करून पाटोदा व अंदरसूल येथील मका व भुसारधान्य खरेदी करणार्‍या परवानाधारक व्यापार्‍यांच्या वखारींवर धाडी टाकून लाखो रुपयांची मार्केट फी वसूल केली. बाजार समितीच्या उत्पन्नात भर घातली होती. बेकायदेशीरपणे मका खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांवर बाजार समितीने वचक निर्माण करताना शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान व वजनमापांमध्ये होणार्‍या फसवणुकीला आळा घातला होता.
कायदेशीररीत्या मार्केट फीची वसुली करताना खरेदीदार व्यापार्‍यांचे परवाने बाजार समितीने रद्द केले नाही अथवा दंडात्मक कारवाई वा कायदेशीर गुन्हे दाखल केले नाहीत. याउलट स्वार्थापोटी काही व्यापारी बाजार समितीची बदनामी करत असून खाजगी बाजार निर्मितीच्या ज्या अफवा पसरवत आहेत त्या कुठल्याही दृष्टीने नजरेत भरणार्‍या नाहीत, असेही सभापती नरेंद्र दराडे यांनी पत्रकात म्हटले आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपला मका व भुसारधान्य कुठल्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता रीतसर बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारावरच आणावा, असे आवाहनही सभापती दराडे यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने