आता ‘मिस कॉल’केल्यावर मिळणार शेतीमालाचे भाव येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची सुविधा

कांदा, गहू, बाजरी, हरभरा, मका आदी शेतीमालाचे दररोजचे ताजे बाजारभाव शेतकरी बांधवांना बघता यावेत यासाठी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘मिस कॉल’ सेवा सुरू केली आहे. एक ‘मिस कॉल’ देताच कॉल करणार्‍याच्या भ्रमणध्वनीवर तत्काळ येवला बाजार समितीमधील दररोजचे बाजारभाव ‘एसएमएस’द्वारे प्राप्त होणार आहेत. ९४२२९९८७१३ या क्रमांकावर ‘मिस कॉल’ करताना शेतीमालाचे बाजारभाव शेतकर्‍यांना विनामूल्य पाहण्यास मिळणार आहेत.
शेतकर्‍यांना घरबसल्या बाजारभाव जाणून घेण्यासाठी बाजार समितीने ही सुविधा सुरू केली असल्याची माहिती सभापती नरेंद्र दराडे, उपसभापती देवीदास शेळके व सचिव डी.सी.खैरनार यांनी दिली. एक ‘मिस कॉल’ देताच त्या दिवसाचे ताजे बाजारभाव शेतकर्‍यांच्या भ्रमणध्वनीवरील ‘मेसेज इनबॉक्स’मध्ये येऊन पडणार असून या सुविधेमुळे शेतकर्‍यांची सोय होणार असल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.
येवला बाजार समितीमधील कार्यालयाच्या संगणीकरण यंत्रणेत विशिष्ट प्रकारचे ‘सॉफ्टवेअर’ बसविण्यात आलेले आहे. मोबाईलवरून दिलेल्या क्रमांकावर कॉल करताच तो कॉल संगणकीय यंत्रणेत पोहोचून तो आपोआप कट होईल. कॉल करणार्‍याला कॉल कट झाल्याने कोणतेही बिल पडणार नसून संगणकाद्वारे त्याच्या मोबाईलवर विनामूल्य बाजारभावाचा संदेश पडणार असल्याची माहिती बाजार समिती सचिव डी.सी.खैरनार यांनी दिली. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे बाजारभाव भ्रमणध्वनीवर उपलब्ध होणार आहेत.
थोडे नवीन जरा जुने