शेतकरी संघटनेने शासनाचा केला निषेध पवार यांच्या वक्तव्यावरून खेद

उसाला भाव मिळावा यासाठी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवर सांगली येथे गोळीबार करणार्‍या शासनाचा येथील शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. देशाचे कृषीमंत्री शरद पवार यांच्या जातीयतेच्या आधारावर वक्तव्य करून चिथावणी देण्याच्या घृणास्पद प्रकाराबद्दल शेतकरी संघटनेने जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकरी संघटना नेते संतू झांबरे, महिला आघाडीच्या संध्या पगारे, अनिस पटेल, सुभाष सोनवणे, सुरेश जेजुरकर, निवृत्ती जगताप, जाफर पठाण, कांतीलाल जगताप, अरुण जाधव, पोपट भालेराव आदींनी आज पत्रक काढत शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी लढ्यात सर्व शेतकर्‍यांनी सामील होण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात फक्त देशाचे स्वातंत्र्य एवढेच ध्येय होते. जात, धर्म, पंथ यांना थारा नव्हता. तसाच हा शेतकर्‍यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा लढा आहे. उसाच्या भावाचा निर्णय राज्यातील साखर कारखान्यांनी घ्यावा, त्यात शासनाचा संबंध नाही असे म्हणणार्‍या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकर्‍यांचा एकप्रकारे विश्‍वासघातच केला असल्याचे शेतकरी संघटनेने पत्रकात म्हटले असून शेतकर्‍यांचा ‘जाणता राजा’ म्हटले जाणार्‍या देशाच्या कृषीमंत्र्यांकडून जातीयवादाच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती असेही शेतकरी संघटनेने पत्रकात म्हटले आहे. शासनाच्या सहकार खात्याच्या नियमानुसार राज्यातील सहकारी साखर कारखाने चालत असतात. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच राज्यकर्ते कारखानदारांच्या पदांवर विराजमान करून मलिदा खाण्याची व्यवस्था करतात. साखरेच्या भावावर नियंत्रण केंद्र व राज्य शासनाचे असते. उसाचा भाव फक्त साखरेचा उतारा आणि साखरेच्या भावानुसार न देता मळी, अल्कोहोल, कागदासाठीचा भुसा आदी इतर उत्पादनांचा विचार करून दिल्यास उसाला ४ ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचे गणित शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी वेळोवेळी मांडले असून यावर राज्यातील सहकारी साखर कारखाने व राज्य शासनाने करावा असे आवाहन केले आहे.
उसाच्या भावासाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर गोळीबार करून दोन शेतकर्‍यांचे बळी घेतले. राज्य शासनाने शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडण्याचा जो घृणास्पद प्रकार केला त्याचा आम्ही संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करतो. कृषीमंत्री शरद पवार यांनी जातीय चिथावणी देण्याचा जो प्रकार केला, त्याचाही तीव्र शब्दांत धिक्कार करतो.
- संतू पा. झांबरे, शेतकरी संघटना नेते, उत्तर महाराष्ट्र
थोडे नवीन जरा जुने