येवला तालुक्यातीलविखरणीत सामुदायिक लक्ष्मीपूजन

विखरणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी सामुदायिक लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीपूजन कार्यक्रमात गावातील मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने सामील झाले. ग्रामपंचायत कार्यालयातील दफ्तरांचे पूजन केल्यानंतर सर्वच ग्रामस्थांनी सामुदायिकपणे फटाक्यांची आतषबाजी करीत फराळाचा आस्वाद घेतला.
दीपावलीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी व लहानमोठ्या दुकानांमधून लक्ष्मीचे पूजन केले जाते. दुकानदार व्यापारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वह्या व संपत्ती, मालमत्तेची पूजा करतात. परंतु आम जनतेची मालमत्ता असलेल्या ग्रामपंचायत, नगर परिषद वा महानगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लक्ष्मीपूजनासाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थ हजर राहात असल्याचे आपल्या ऐकिवात कधीच नाही. मात्र याला अपवाद ठरली आहे ती तालुक्यातील विखरणीची ग्रामपंचायत. गेल्या तीन वर्षांपूर्वी मोहन शेलार या युवकाने ग्रामपंचायतीची सत्ता हाती घेतली अन् गावातील विकासकामे करीत ग्रामपंचायतीच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीचे दैनंदिन व्यवहार, जमा खर्च ग्रामपंचायतीच्या फलकावर गेल्या तीन वर्षांपासून दररोज न चुकता लिहिले जातात. आज सालाबादप्रमाणे गावातील सर्व धर्माचे, जातीचे ग्रामस्थ, महिला, वृद्ध, लहान मुले, मुली ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले. सर्वप्रथम सरपंच हिराबाई शेलार, उपसरपंच नामदेव पगार यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थांच्या हस्ते लक्ष्मीचे पूजन करण्यात आले.
ग्रामपंचायत मालमत्ता, इमारत निधी या सर्वांचे मालक खरे गावातील गावकरीच आहेत. त्यांच्या हातून लक्ष्मीपूजन होणे हे खरे कार्य आहे. निवडून आलेले सदस्य काही कालावधीचे ‘कारभारी’ असतात. त्यामुळे खरे मालक ग्रामस्थच असल्याने महाराष्ट्रात पहिली आमच्या गावाची ग्रामपंचायत असेल की जेथे तीन वर्षांपासून सामुदायिक लक्ष्मीपूजन केले जाते.
- मोहन शेलार, ग्रामपंचायत सदस्य
थोडे नवीन जरा जुने