येवल्याचे पैठणी उत्पादक शांतीलालसा भांडगेंना राष्ट्रपती पुरस्कार

राष्ट्रपती पुरस्कार विजेते पैठणी उत्पादक शांतीलालसा भांडगे यांना शुक्रवारी दिल्लीच्या विज्ञान भवनात वस्त्रशिल्पासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संत कबीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. भांडगे परिवारात पैठणीसाठी केंद्र सरकारचा सलग ५ वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून शांतीलाल भांडगे यांना दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने येवल्याच्या पैठणी उत्पादनात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अस्सल पैठणीसाठी संपूर्ण जगभरात येवल्याचे नाव घेतले जाते. पैठणीचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या येवल्यात सुमारे ५ हजार हातमाग व हजार विणकर आहेत. या विणकरांनी हातमागावर पैठणी विणण्याची कला जोपासतानाच सातासमुद्रापार येथील पैठणी पोहोचविली आहे. महिलांना भुरळ घालणार्‍या पैठणीने आधुनिक काळातही आपली ओळख कायम ठेवली आहे. पैठणीतील नावीन्यपूर्ण संशोधन आणि तिच्या प्रचार, प्रसार, गुणवत्ता सुधार आणि नवीन पिढीला प्रोत्साहनासाठी सतत झटणार्‍या भांडगे यांना काल शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हस्तकला आणि विणकला क्षेत्रातील मानाचा कबीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोहळ्याला केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भांडगे यांना सुवर्णपदक, नामपत्र, ७ लाख रुपये रोख व वस्त्र देण्यात येऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
भांडगे परिवारात ५ वा राष्ट्रीय पुरस्कार
शांतीलालसा भांडगे यांना यापूर्वी १९९१ मध्ये पैठणी उत्पादनातील ‘आसावली ब्रॉकेड’ या नक्षीकामाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. यावेळचा संत कबीर हा राष्ट्रीय पुरस्कार वस्त्रशिल्पासाठी पैठणीच्या नवीन नक्षीकामासाठी मिळाला आहे. १९९८ मध्ये शांतीलालसा यांचे बंधू दिगंबरसा भांडगे यांना ‘टसर पैठणी’साठी प्राप्त झाला होता. २००१ मध्ये शांतीलालसा भांडगे यांचे सुपुत्र महेश भांडगे यांना टिश्यू ब्रॉकेट’साठी तर २००३ मध्ये राजेश भांडगे यांना ‘जरी स्ट्रेप्स’ पैठणीसाठी मिळाला होता.
संत कबीर या राष्ट्रीय पुरस्काराने माझ्या कामाचे सार्थक झाले आहे. पैठणीची कला जोपासताना शहरातील विणकरांनी पैठणीचे नाव सातासमुद्रापार नेले. आज आधुनिक काळातही पैठणीने आपली परंपरा जोपासली आहे आणि टिकवून ठेवली आहे. नकली व सेमी पैठणीच्या विक्रीने अस्सल पैठणी बनविणार्‍या विणकरांवर अन्याय होतो हीच फक्त खंत आहे.
- शांतीलालसा भांडगे
थोडे नवीन जरा जुने