मुंबई, दि. 16 जुलै: येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी सानिया मालीम हिने सन 2011-12मध्ये घेण्यात आलेल्या बी.फार्म.च्या अंतिम परीक्षेत 79.4 टक्के गुणांसह मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या यशाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा एम.ई.टी.चे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी तिचे आज अभिनंदन केले आणि भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.सानिया मालीम हिने शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विविध अभ्यासेतर उपक्रमांमध्येही सातत्यपूर्ण सहभाग घेतला असून त्याबद्दल तिला पुरस्कारही मिळाले आहेत. यामध्ये इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचा ‘बेस्ट स्टुडंट’ पुरस्कार, आर.एक्स. टेक फेस्टीव्हलमध्ये व्यावसायिक नियोजनाच्या सादरीकरणासाठी पारितोषिक, महाराष्ट्रातील सर्व फार्मसी महाविद्यालयांमधून बेस्ट स्टुडंट म्हणून गौरव, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या स्टुडंट काँग्रेसमध्ये सहभागाची संधी इत्यादींचा समावेश आहे. एमईटीमध्येही प्रत्येक सेमिस्टरमध्ये तिने सातत्याने डिस्टिंक्शनसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सानिया मालीम हिच्या अष्टपैलू कामगिरीचे श्री. भुजबळ यांनी यावेळी मनापासून कौतुक केले. फार्मास्युटिकल क्षेत्रात तिचे भवितव्य अतिशय उज्ज्वल असून ती ‘एमईटी’चा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी आमदार पंकज भुजबळ, एमईटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमधील शिक्षक आणि मालीम कुटुंबीय उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार पंकज भुजबळ, एमईटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमधील शिक्षक आणि मालीम कुटुंबीय उपस्थित होते.