जनतेचे प्रश्न सतत मांडण्यात अग्रेसर असणाऱ्या दै .सकाळवरून साभार येवला - रस्ते थोडे जरी खड्ड्यांत गेले तरी दर वर्षी गणेशोत्सवात त्यात मुरूम टाकला जाऊन गैरसोय टाळली जाते. यंदा मात्र पालिकेचीही मोठी पंचायत झाली आहे. याचे कारण आहे, ते खड्डे पडलेल्या रस्त्यांत "थिगळ' तरी कुठे-कुठे लावणार या सतावणाऱ्या प्रश्नाने पालिकेने एकाही रस्त्यावर मुरूम व ग्रीट टाकण्याची तसदी न घेतल्याने यंदा बाप्पाचीही वाट जरा बिकटच असून, या खड्ड्यांतून मिरवणूक कशी न्यावी, हा प्रश्न गणेश मंडळांना सतावत आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्याचा हा मतदारसंघ गुळगुळीत रस्त्यामुळे चर्चेत आला होता; पण शहरात भरीव कामे न झाल्याने आज शहराच्या रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे. शहरातील रस्ता खड्ड्यांत गेल्याने गेल्या महिन्यात "मनसे'ने खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून केक कापला होता. हे आंदोलन चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेसह युवा सेनेने मनमाड- नगर महामार्गातील "बीओटी'च्या रस्त्यावर वृक्षारोपण करून खड्ड्यांची जाणीव करून दिली होती. त्यानंतरही या खड्ड्यांची दुरुस्ती झालेली नाही. पालिकेने आंदोलनानंतर मुरूम टाकला होता; पण पावसामुळे या मुरुमाची दलदल होऊन घसरगुंडी तयार झाली आहे. सध्या शहरातील मेन रोड, गांधी मैदान येथील व महिन्यापूर्वी झालेल्या बसस्थानक ते शनिपटांगण आणि गंगादरवाजा ते काळामारुती याच रस्त्यांची अवस्था जरा चांगली आहे. शनिपटांगण ते सप्तशृंगी मंदिराच्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविल्याने चेहरामोहरा बदलला आहे. मात्र, पालिका रोड, बुरूड गल्ली, देवी खुंट, जुना तहसील, आझाद मैदान यांसह शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांत खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचून डबके नव्हे तर "मिनी तळे' तयार झाले होते. तरीही पालिकेने या गंभीर प्रश्नांकडे डोळेझाक केली आहे. या सर्व रस्ता कामाला निधी मंजूर असून, पाऊस उघडताच कामेही सुरू होणार आहेत; पण जेव्हा गंगादरवाजा व बसस्थानकाच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले, त्याचवेळी या रस्त्यांची कामे का झाली नाहीत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीअभावी या कामाला उशीर झाल्याचे देण्यात येणारे कारणही सयुक्तिक वाटत नाही. तीन महिन्यांपासून निधी मंजूर होऊनही जर शहरवासीयांना खड्ड्यांतून जावे लागत असेल, तर उपयोग काय? हाही चिंतेचा व यंत्रणेच्या अपयशाचा विषय आहे. शहरात गणरायाच्या स्थापनेच्या व विसर्जनाच्या भव्य मिरवणुका निघतात. या मिरवणुका जातात, तेथेच मोठमोठे खड्डे पडल्याने मंडळापुढेही चिंता असून, नाराजीही व्यक्त होत आहे. सत्ताधाऱ्यांना याचे सोयरसुतक नाही, तर विरोधक आंदोलने करतात. मात्र, तेही दडपून टाकले जातात. परिणामी जनतेलाही निमूटपणे आहे ती परिस्थिती स्वीकारावी लागत आहे. शिवसेना शहरप्रमुख म्हणतात...!शहराच्या गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे, तरीही रस्त्याच्या प्रश्नांवर पालिका व इतर सर्वच उदासीन आहेत. यामुळे मंडळांना खड्ड्यांतून जावे लागणार आहे. पालिका फक्त भूषण ठोकते, आश्वासने देते. मात्र, जनहित पाहिलेच जात नाही. पालिकेने मुरूम, ग्रीट टाकून तत्काळ विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवावेत, तसेच विसर्जनाच्या विहिरीचा गाळ काढावा; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही! - राजेंद्र लोणारी, शहरप्रमुख, शिवसेना 'मनसे'चे शहरप्रमुख म्हणतात... आंदोलने करूनही दखल न घेणाऱ्या यंत्रणेला काय म्हणावे. शांतता कमिटीच्या बैठकीत आश्वासने देऊनही रस्ते दुरुस्त झाले नाहीत व वीज कंपनीने ताराही ओढल्या नाहीत. गणेशोत्सव असूनही दुर्लक्ष करणे गैर आहे. पालिका गणपतीचे विसर्जन झाल्यावर रस्ते दुरुस्त करणार आहे का? नागरिकही बोलू लागले...!सन्माननीय श्री. भुजबळसाहेब आपल्या अध्यक्षतेखाली तसेच बहुमूल्य मार्गदर्शनातून संपूर्ण येवला तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे; परंतु अजूनही येवल्यातील रस्ते, गल्लीबोळा आणि गटारी या विकास कार्यापासून वंचित राहिलेल्या दिसतात. सर्वच गल्ल्या व रस्ते यांची अत्यंत दयनीय अवस्था असून, निराळी गल्ली, लोणार गल्ली, सारख्या परिसरात 30 ते 35 वर्षांपासून दुरुस्ती कामे झालेली नाहीत. तसेच गटारींमधील ओला कचरा, मैला संपूर्ण रस्त्यावरून काढून ठेवला जातो. त्यामुळे आबालवृद्धांना आरोग्य स्वास्थ्याच्या तक्रारींना तोंड द्यावे लागत आहे. डास, माशा, किडे, दुर्गंधी यामुळे वातावरण दूषित होत राहते. तेव्हा येवल्यामधील दुर्लक्षित गल्लीबोळा, रस्ते व सर्व गटारींच्या दुरुस्ती नूतनीकरणाच्या कामात त्वरित लक्ष घालून त्रस्त नागरिकांना दिलासा द्यावा, त्रासातून मुक्त करावे, असे कळकळीचे नम्र निवेदन...! - सौ. सोनाली राहुल कुलकर्णी, येवला | |